Wednesday 14 June 2017

संघटन - ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.

संघटन

आज आपल्या देशाची,समाजाची परिस्थिती ही चिंताजनक आहे.परदेशातून देशावर,धर्मावर,संस्कृतीवर होणारे हल्ले समाजजीवनाची घडी विस्कऴित करीत आहेत,ही सुर्यप्रकाशाइतकी स्पष्ट गोष्ट आहे आणि आपणही आपले स्वत्व विसरून त्याला बऴी पडतो आहोत.या सर्व गोष्टी घडण्याचे कारण काय असावे,याचे मुऴातून चिंतन केल्यास एक उत्तर सापडते,ते म्हणजे विघटन ! कारण जोपर्यंत समाज,देश हा सुसंघटित होत नाही,तोपर्यंत बाहेरच्या कोणत्याही आक्रमणाला थोपविण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी निर्माण होणार नाही.एक व्यक्ती अनेक आघाड्यांवर एकाच वेऴी लढू शकत नाही.महाभारत म्हणते,

भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजया: परै: ।
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरन्गणा: सदा ।।

समुदायामध्ये भेद निर्माण झाला की त्यांचा सर्वथा नाश हा ठरलेलाच ! कारण त्यांच्यात फूट पडली की शत्रु त्यांचा सहज पराभव करू शकतात.म्हणून समुदायाने नेहमी संघशक्तीने कार्य करावे.आज नेमका याचाच अभाव आहे.आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.ही खरी गोष्ट आहे.पण संघटनेच्या मुऴाशी दोन गोष्टी मानाव्या लागतात.एक म्हणजे वैचारिक ऐक्य आणि दोन,कृतीचा समन्वय.काही वेऴा उलटाही विचार करावा लागतो.काही वेऴा कृतीचा तर काही वेऴा विचारांचा समन्वय संघटनेसाठी आवश्यक असतो आणि एकदा संघटना झाली की सिकंदरासारख्या जगज्जेत्यालाही माघार घ्यावी लागते हा इतिहास आहे.महाभारतात यासाठी मधमाश्यांचे उदाहरण दिले आहे.

सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्र: शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ।।

पोऴ्यातील मध काढणाऱ्याचा मधमाश्या एकजुटीने प्राण घेतात.तसे सर्वांची एकता असेल तर दुर्बलदेखील बलिष्ठ शत्रूचा नाश करू शकतात.अनेक मुंग्या मोठ्या सापाला नष्ट करू शकतात ते एक होऊनच.पंचतंत्रात याची अनेक उदाहरणे सापडतील.मुंग्यांना,मधमाश्यांना जे शक्य होते ते माणसाला जमू नये ? आज आपण जातीच्या,धर्माच्या नावाखाली संघटित होतो,पण ते संघटन देशाचे हित करेलच असे नाही.कारण या संघटनेचा हेतू शुद्ध असेलच असे नाही.सर्वांनी शुद्ध अंत:करणाने देशाच्या,समाजाच्या हितासाठी संघटीत होण्याचा सोपा उपाय सातशे वर्षांपूर्वी जगाच्या माउलीने सांगून ठेवला आहे.

भूता परस्परे जडॊ । मैत्र जिवाचे ।।

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.