Sunday 4 June 2017

कसॊटी - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

अनेक संकटातून,प्रतिकूल परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर माणूस परिपक्व होतो.
सर्व मोठ्या महात्म्यांची चरित्रे पाहिली तर याची अनेक उदाहरणे पाहावयाला मिऴतील.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप वगैरे योद्ध्यांची किंवा संतांची चरित्रे पाहिल्यास अत्यंत हालअपेष्टातून त्यांना जावे लागले असे दिसते.पण त्यामुऴेच त्यांची चरित्रे घडली.श्रीतुकोबाराय म्हणतात,

तुका म्हणे तोचि संत ।
सॊसी जगाचे आघात ।।

सुभाषितकाराने ते आघात कोणते, हे दृष्टांताने सांगीतले आहे.

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते,
निघर्षणच्छेदनतापताडनै: ।

तथा चतुर्भि: पुरूष: परीक्ष्यते: श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

एखाद्याला सोन्याच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला तर तो सोनाराकडे जातो.सोनार कसोटीवर घासतो.सोन्याची कसोटी चार प्रकाराने होते.त्या कसोटीतून सोन्याचे गुण तपासले जातात.कसोटीवर घासून त्याची चकाकी तपासली जाते,त्याला तोडून त्याचा चिवटपणा पाहिला जातो,त्याला तापवून त्याचा रंग बदलतो,त्याला हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा, ते ताणले जाते की नाही हे पाहिले जाते.नंतर सोन्याला किंमत येते.सोनेसुद्धा कसोटीला लावले जाते,तेव्हांच त्याला सोने म्हटले जाते.त्याप्रमाणेच माणसालाही मोठे व्हायचे असेल तर त्यालाही कसोटी लावावी लागते.त्याच्या ठिकाणचे ज्ञान,त्याचे शील,गुण आणि त्याचे आचार यावरून माणसाचे मोठेपणं ठरत असते.यांपैकी एकही गुण नसेल तर त्याचे मोठेपणं कुचकामी ठरते.
छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिल्यास हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी प्रसंगपरत्वे पाहायला मिऴतात,म्हणूनच तर ते जगासमोर आदर्श ठरले.

।।राम कृष्ण हरी ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.