Monday 9 July 2018

श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥ - ०१

*✨॥ श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥✨*

       *☆☆☆ अभंग क्र.१ ☆☆☆*

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरि वृत्ती राहो ॥१॥

आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त नको देवा ॥२॥

ब्रह्मादिक पदें दु:खाची शिराणी ।
तेथें दुश्चित्त झणीं जडो देसी ॥३॥

तुका म्हणे त्याचें कऴलें आम्हा वर्म ।
जें जें कर्मधर्म नाशवंत ॥४॥

*अर्थ:-* हे हरी,समान चरण आणि समान दृष्टी असलेली जी तुझी विटेवर सुंदर मूर्ती आहे तेथे माझी अंत:करणवृत्ती अखंड राहो.॥१॥

देवा,तुझ्यावाचून इतर कोणतेही मायिक पदार्थ मला नको आहेत.येवढेच काय,पण त्याविषयी माझ्या मनात इच्छादेखील निर्माण होणे नको आहे. ॥२॥

आता ही विवेक - वैराग्ये मर्यादित पदार्थाविषयी नसून ब्रह्मलोकापर्यंत आहेत हे पुढील चरणात सांगतात. ब्रह्मलोक इत्यादी स्थाने दु:खाची पराकाष्ठा आहेत.॥३॥

देवा,संसारातील कोणत्याही पदार्थाचे वर्णन ऐकून आमचे अंत:करण विक्षिप्त आणि अनिश्चयात्मक होणे शक्य नाही.कारण *जगद्गुरु श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, त्या पदार्थाचे खरे स्वरूप आम्हास कऴले आहे.ते असे की,जे जे कर्म - धर्मजन्य असते ते ते विनाशी असते.॥४॥

*॥ रामकृष्णहरि ॥*  🚩🙏🏻