Sunday, 4 September 2016

हरतालिकेची माहिती आणि कथा

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||

दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.
आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.
आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्‍यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.
वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.
सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्‍याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.
माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.
चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.
हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.
(टीप :- देवी उमाणी प्रेम केले ते भगवान शंकर होते इतक लक्षात ठेवा आपणास शंकर भेटन सध्या तस अवघड आहे या कलियुगात म्हणून सहसा घरच्यांची मन कधी दुखवू नका कोणी हि गोष्ट करताना प्रथम कुटुंबाचा विचार करा इतकाच मला वाटल सांगाव म्हणून सांगितल )
आता मी पाहतो मुंबई पुणे सारख्या शहरात लहान लहान मुले म्हणतात आह्मी प्रेम करतो पण ते प्रेमे भावनेतून करा कामनेतून न करता मग का लागेल आपल्या आई बहिणींना संरक्षण फक्त सर्वांच्या मनात सर्व्न्विषयी हिताची , मदत करण्याची आदराची भावना पाहिजे  पण मी वाट पाहतोय कधी एकदाच येतय राम राज्य !
प्रेम करा ते प्रथम आई बाबांवर ज्यांच्या  मुळे  आपण आहोत प्रेम करा आपल्या संतांवर प्रेम करा ते आपल्या संस्कृती परंपरेवर इतकाच माफ करा हा काही चुकल असेल अथवा एखाद्या व्यक्तीच मन  दुखवल गेल असेल तर पण ते व्हावं म्हणून तर लिहलय .
आपला ,
अक्षयमहाराज भोसले 
८४५१८२२७७२ .

Thursday, 1 September 2016

श्रीगणेश उत्सव महाचर्चा - सह्याद्री वाहिनी

श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची लाडकी वाहिनी : सह्याद्री वाहिनीवर महाचर्चा
प्रत्यक्ष सहभाग
श्री मिलिंद भारंबे -पोलीस उपआयुक्त , मुंबई
.श्री नरेश दहीबावकर - कायदेशिर सल्लागार
श्रीबाळासाहेब कांबळे - अध्यक्ष :लालबागचा राजा मंडळ , मुंबई
श्रीअशोक गोडसे - अध्यक्ष : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश संस्थान पुणे
फोन द्वारे  सहभाग :
श्रीअक्षयमहाराज भोसले - अध्यक्ष :वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

अवश्य पहा - सहयाद्री वाहिनी
पुनप्रक्षेपण :
दि.०२ सप्टेंबर २०१६
सकाळी ०९.०० वा.

Wednesday, 31 August 2016

प.पू. श्रीगुरु ह.भ.प.श्रीप्रमोदमहाराज जगताप यांचा आज जन्मदिन !

स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी - एक चिॅतन !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु :।।

आमच्या पंढरीतलेच आदरणीय अप्पा उपाख्य पूर्वाश्रमीचे अनंतराव दामोदरराव आठवले जे पुढे संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती झाले ! अप्पांचा, काल पुण्यस्मरणाचा दिवस होता ! योगशास्त्रात ज्या निर्विकल्प व सविकल्प समाधी अवस्थेचे वर्णन केलंय, त्या निर्विकल्प समाधी अवस्थेस प्राप्त झालेला एक महापुरुष म्हणजे आदरणीय अप्पा !

एथ वडील जे आचरिती
तया नाम धर्म ठेविती
येर तेंचि अनुष्ठिती
सामान्य सकळ !

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या ह्या सिद्धांताप्रमाणे अप्पांचे पूर्ण जीवनच आपल्या सद्गुरुंच्या अर्थात संतकवी दासगणु महाराजांच्या मार्गदर्शनातच व्यतीत झालं ! दासगणुमहाराजांसारखा विद्वान व संतकवी सद्गुरु लाभलेल्या मनुष्यांस बालपणीच कृष्णभक्तीचा लळा लागला व वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच अप्पांनी "श्रीकृष्ण कथामृत" हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या चरित्रावरचा ओवीबद्ध ग्रंथ रचला ! २००७ ह्या वर्षात हा ग्रंथ सिंबायोसिस महाविद्यालयात असताना माझ्या वाचण्यांत आला. ह्या ग्रंथातून त्या वयात अप्पांची प्रतिभा ही किती संपन्न होती हे दिसून येते ! अर्थात योग्यतेला वयाची मर्यादा नसतेच तरीपण हा ग्रंथ श्रीकृष्णभक्तांसाठी अनुपम आहे. उपमालंकाराने नटलेला हा ग्रंथ कधीकधी डोळ्यात चटकन पाणी आणतो.

हा ग्रंथ ऐकायचा तर आमचे गुरुवर्य भागवताचार्य श्री. वा ना उत्पातांच्या श्रीमुखातून श्रीमद्भागवत आख्यानात ! अर्थात वा. ना. महाराज त्यांचे एक प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण कथामृत ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. अप्पांच्या ग्रंथसंपदेची ओळख आम्हांस आदरणीय वा. ना. महाराजांमुळेच झाली, हे वेगळं सांगायला नको.

अप्पांची विलक्षण ग्रंथसंपदा
श्रीकृष्ण कथामृत, भगवद्गीतेवरच्या प्रत्येक अध्यायावरचं अप्पांचे भाष्य, प्रस्थानत्रयी अशा ब्रह्मसूत्रांवरचं व उपनिषदांवरचंही अप्पांचं भाष्य ही त्यांच्या अलौकिक व प्रखर बुद्धिमत्तेचा व विद्वत्तेचा कळस आहे.

मनुस्मृतीवरचं अप्पांचे भाष्य
ज्यांना मनुस्मृती हा ग्रंथ व्यवस्थित समजून घ्यायचा असेल त्यांनी अप्पांचे सार्थ मनुस्मृती भाष्य वाचायलाच हवे ! अप्पांच्या प्रत्युत्पन्न मतीचा आविष्कार ह्या ग्रंथात आपणांस पहावयाला मिळतो. जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य वाचावा ही विनंती ! ग्रंथाचा विस्तार मोठा असली तरी ग्रंथ निश्चितच वाचनीय व चिंतनीय !

महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात
अप्पांच्या एकुणच व्यक्तिमत्वावर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात ! ह्या ग्रंथात अप्पांनी महाभारतावरच्या आक्षेपांस जे सप्रमाण व साधार उत्तर दिलंय ते पाहिलं की मन थक्क होते ! इरावती बाई कर्वेंपासून ते आनंद साधले व इतर अनेक आक्षेपकांचे नाव घेऊन सप्रमाण व साधार खंडण करणारे अप्पा हे विद्वत्तेचा कळस होते ! त्यांनी कर्णाच्या उदात्तीकरणाला केलेला विरोध, जो त्यांनी सोबत नावाच्या तत्कालीन मासिकातही लेखरुपाने प्रकाशित केला होता तोही वाचनीय आहे. सोबत मध्ये कर्णावर अप्पांचा लेख आलेला आम्ही वाचलाय. सोबत हे सत्तर व ऐंशीच्या दशकातलं ग. वा. बेहरेंचे एक अभ्यासपूर्ण प्रकाशन होते ! ह्या सोबत मध्ये तत्कालीन अनेक विद्वानांचे अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक भूमिका मांडणारे लेख आपणांस वाचावयांस मिळतील. ते अवश्य वाचावेत.

ज्ञानेश्वरीवर समश्लोकी औवीबद्ध भाष्य करणारे अप्पा !
ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा एक मेरुमणी आहे. गेली सात दशके ह्या ग्रंथराजाने मराठी मनांस जी भूरळ घातलीय ती काही केल्या कमी तर होणार नाहीच नाही. ह्या ज्ञानेश्वरीवर प्रत्येक ओवीवर ओवीरुपातच भाष्य करणारे अप्पा हे काय प्रतिभा संपन्न होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तत्कालीन ज्ञानेश्वरीवरील एक आदरणीय भाष्यकार गुरुवर्य धुंडा महाराज देगलुरकरांची त्यांस प्रस्तावना आहे. देगलुरकर हे नाव ज्ञानेश्वरीशी इतकं जोडलं गेलंय की विचारायांसच नको. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर तशाच ओव्या रचणं हे येरागबाळाचे काम नोव्हे !

आणखी काही ग्रंथाचा परिचय
अप्पांची ग्रंथसंपदा ही विपुल आहे. *यक्षप्रश्न* ह्या ग्रंथात त्यांनी महाभारतातल्या यक्ष-युधिष्ठिर संवादावर केलेलं भाष्य हे निश्चितच चिॅतनीय आहे.

वाटा आपल्या हिताच्या - अप्पांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ
हिंदुधर्मावरच्या आक्षेपांचं निवारण करणारा हा प्रश्नोत्तररुपी ग्रंथ ज्यात अनेक विषयांवरचे प्रश्न व त्यांस अप्पांनी दिलेलं समर्पक उत्तरे असा हा ग्रंथ ! सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकरांच्या एका मासिकांत हा ग्रंथसंवाद छापून आलेला आम्ही वाचलाय. अनेक शंकाकुशंकाचे निवारण करणारा हा ग्रंथ प्रत्येक हिॅदुमात्रांस आवश्यक आहे.

श्रीकृष्ण चरित्र
ह्या ग्रंथात अप्पांनी भगवान श्रीकृष्णावरच्या अनेक आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण केलंय. श्रीकृष्णावर अनेकांनी अनेक आक्षेप अकारण घेतले आहेत. अप्पांनी ह्या ग्रंथात मांडलेले कृष्ण चरित्र हे निश्चितच अभ्यसनीय आहे.

समर्थ चरित्र प्रवचन !
अप्पांची अनेक प्रवचने व कीर्तने आज ध्वनिमुद्रित स्वरुपात व चलतचित्र स्वरुपात उपलब्ध आहेत. Samarth ramdas संकेतस्थळांवर त्यांचे समर्थ चरित्रावरचे अडीच तासाचे जे प्रवचन उपलब्ध आहे, ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मनुष्यांस झाल्याशिवाय राहत नाही.

वारकरी पंथ व रामदासी पंथांचे समन्वय साधणारे अप्पा !
जगद्गुरु तुकोबाराय व समर्थ रामदास ह्या दोन संतश्रेष्ठांच्या जीवन तत्वज्ञानाचे समन्वय साधणारे अप्पा हे तत्कालीन विद्वानांमध्ये अग्रणी होते. हा प्रयत्न त्यांनी अनेक दशकांपूर्वी केला होता. कारण वारकरी पंथ व रामदासी पंथांत हेतुपुररस्सर भेद निर्माण करणारे काही नालायक लोकही ह्या महाराष्ट्रात त्याकाळीही होते व आजही ते आहेत हे खेदांने म्हणावंसं वाटतं. अप्पांनी हा समन्वयाचा एक स्तुत्य
प्रयत्न त्यावेळी केला होता हे एक नवलपूर्ण होते.  आज तोच प्रयत्न आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज(पूर्वाश्रमीचे आदरणीय
किशोरजी व्यास) करताहेत हेही नसे थोडके !

स्तोत्र रचना
अप्पांचे संस्कृत भाषेवरचे असामान्य प्रभूत्व हे त्यांच्या प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यात तर आपणांस दिसून येतंच. पण तरीही त्यांनी रचलेली स्तोत्रे ह्यावरून त्यांची अनुपम भक्ती व ह्या गीर्वाणवाणीवरचे प्रभूत्व दिसतं. जगत्जननी रुख्मिणी मातेवर रचलेले त्यांचे रुक्मिणी अष्टक हे आचार्यांच्या पांडुरंगाष्टकप्रमाणेच गेय व भक्तीरसाने ओथंबलेले आहे. आमच्या पंढरीत रुक्मिणी सभागृहात ते लावलेलं आहे.

अप्पांची राष्ट्रनिष्ठा
अप्पांनी रचलेले पोवाडे व फटके हे त्यांच्या राष्ट्रभक्तीचे द्योतक आहेत. अप्पा हे त्या न्यायाने एक क्रांतिकारकच होते असं म्हटल्यांस वावगं ठरणार नाही. ते हिॅदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांवर प्रेम करणारे होते.

एक आयुर्वेदाचार्य
अप्पा हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांचा जन्म व बालपण जरी पंढरीत गेलेलं असलं तरी त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा पुण्यातच
व्यतीत झाला होता. पुण्यातल्याच एका आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राचार्यपदावरही आरुढ झाले होते. आयुर्वेदाचं त्यांचं ज्ञान अफाट होते.

तेजाचं चांदणं - अप्पांचे चरित्र
अप्पांच्या समाधीनंतर त्यांच्या अधिकारी शिष्यांनी त्यांचे चरित्र प्रकाशित केलं होते. सिंबायोसिस मध्ये असताना आमच्या ते वाचण्यांत आले होते. ह्या चरित्रांत नावाप्रमाणेच अप्पांचे जीवन हे एका तेजाचे चांदणं हे सार्थ होते ह्याचा प्रत्यय येतो.

अप्पांचा शिष्यपरिवार महाराष्ट्रात सुविख्यात आहे.

ज्येष्ठ अभ्यासक,वक्ते,राष्ट्रविचार प्रसारक व ख्यातनाम लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे, आदरणीय कल्याणी नामजोशी,भागवताचार्य वा. ना. उत्पात,त्यांचे पुत्रद्वय वैकुठंवासी चंद्रशेखर महाराज अाठवले व कंपनी सेक्रेटरी म्हणून विख्यात असे महेश आठवले हा महाराष्ट्रातला एक अधिकारी व अभ्यासु वर्ग अप्पांस शिष्य म्हणून लाभलाय.

अप्पांची समाधी
अप्पांनी काल म्हणजे श्रावण कृष्ण त्रयोदशीस समाधी घेतली. योगमार्गाने टाळूतून प्राणत्याग करून ते ब्रह्नलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र प्रणाम !!!
भवदीय,

- श्री.तुकाराम चिंचणीकर
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

सज्जन -प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
जगामध्ये सज्जनांना नावे ठेवणे नवे नाही.अनादिकालापासून हे चालू आहे.  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या काऴामध्ये त्यांचा महिमा ओऴखणा-यांपेक्षा त्यांना नावे ठेवणारेच अधिक होते.संतांना नावे ठेवणारे तेव्हाच होते असे नाही,तर आजही त्यांना नावे ठेवणारे आहेत.मर्यादापुरुषोत्तम प्रभूरामचंद्रांनाही लोकांनी नावे ठेवली. गुणवानाला फार मोठ्या परिक्षेतून जावे लागते.ते कसेही वागले तरी समाज त्यांना नावे ठेवतोच.पण समाज कसाही वागला तरी संत मात्र समाजाच्या हिताचेच चिंतन करतात.कारण समाज किंवा समाजातील दुष्ट लोक वाईट वागतात म्हणून संतही वाईट वागू लागले,तर दुर्जनांत आणि यांच्यात अंतरच राहणार नाही.दुर्जन कसाही वागला तर सज्जनांची दृष्टी नेहमीच चांगली असते,तर दुष्टांची वाईट!! मंबाजींनी श्रीतुकाराम महाराजांना काठीने मारले तरी तुकोबाराय,मारून मंबाजीचे हात दुखले असतील म्हणून त्याचे हात दाबण्यासाठी त्याच्या घरी गेले.संतांचा असा स्वभाव असतो.सुभाषितकार म्हणतात,

गुणायन्ते दोषा: सुजनवदने दुर्जनमुखे
गुणा: दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ।।
महामेघ: क्षारं पिबति,करुते वारि मधुरं
फणी क्षीरं पीत्वा वमति गरलं दु:सहतरम् ।।

सज्जनाच्या बोलण्यामध्ये इतरांचे दोषही गुण म्हणून येतात तर दूर्जनाच्या मुखी इतरांचे गुणसुद्धा दोष होतात,यात आश्चर्य असे काहीच नाही.मेघ समुद्रातील क्षारयुक्त खारट पाणी पितात आणि जगाला गोड पाणी देतात आणि साप दूध पितो आणि असह्य विष ओकतो.मेघ सज्जन आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा पसायदानामध्ये 'खल' म्हणजे दुष्ट नष्ट व्हावेत असे मागता आले असते.पण त्यांनी  मागितले नाही.त्यांनी तसे मागितले असते तर त्यांना कोणी संत म्हटले नसते.त्यांची सज्जनता शब्दांतून प्रगट झाली- ' जे खऴांची व्यंकटी सांडो ।' दुर्जनाबद्दलही ते चांगल्याच भावनेतून विचार करतात.आपण मेघ आहोत की साप, ते आपण तपासून पाहिले पाहिजे.

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
https://m.facebook.com/chaitanyamaharajdeglurkar/