Saturday 29 August 2015

लक्ष्मणासारखा भाऊ सापडणार नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
         वाचिक जपापेक्षा उपांशू जप श्रेष्ठ तर उपांशूपेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे. कारण मानसिक जप हा प्रभू रामापर्यंत घेऊन जाण्याचे साधन आहे. हे रामस्मरण केल्याने जन्म-मरण संपते म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर रामनामस्मरण करावे. सीतेसारखी दुसरी पत्नी या मृत्युलोकात मिळू शकेल; मात्र लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ या जगात शोधूनही सापडणार नाही, असे प्रभू रामचंद्राने म्हटले असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थानतर्फे आयोजित 'अध्यात्म रामायण' प्रवचनमालेत ते बोलत होते. दशरथांच्या तीन राण्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चार अलौकिक पुत्र अवताराला आले. संपूर्ण अयोध्या नगरी रामनामात तल्लीन झाली. योगी, मुनीवर ज्या नामात रमतात ते नाव राम असल्याने वसिष्ठ ऋषींनी हे नाव निवडले तर नवमीला प्रभुरामाचा जन्म झाल्यानंतर दशमीला सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला. शोभा, सौंदर्यवान, दास्यवती, लक्ष्मीयुक्त म्हणून वसिष्ठांनी त्याचे नाव लक्ष्मण ठेवले. राक्षसी सुवर्ण मृगामागे जाऊ नये म्हणून लक्ष्मणाने केलेली विनवणी, सुग्रीवाने दिलेले दागिने ओळखणे, राम-सीतेपैकी कोणाचे पाय सुंदर या प्रश्नाचे अलौकिक उत्तर सृष्टीच्या निर्मात्याला सीतेसाठी व्याकूळावस्थेत असताना लक्ष्मणाने केलेली सोबत लक्ष्मणाच्या गुणांची महती हे सगळ्य़ात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२