Friday 28 August 2015

प्रभू रामाचे शरीर हे चिन्मय होते - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
अवताराला आलेल्या भगवान श्रीरामाचे शरीर हे सच्चिदानंद शरीर असून त्याला दिव्य देह म्हणतात. उलट सामान्यांचे शरीर हे दिव्यही नाही अन् नित्यही नाही. स्वर्गातील देवादिकांचे (इंद्र, चंद्र, सूर्य) शरीर हे दिव्य आहे पण नित्य नाही, प्रभू रामचंद्राचे शरीर हे दिव्यही आहे आणि नित्यही आहे म्हणून त्याला चिन्मय शरीर म्हणतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, चिन्मय शरीर हे भगवंताच्याच ठिकाणी असते, सत्शक्तीने हे शरीर अवतारी बनते, तर भगवंताच्या ठिकाणी असलेल्या चित्तशक्तीने हे शरीर प्रकाशमय बनते असे महाराजांनी स्पष्ट केले. भगवंताच्या ठिकाणी असलेल्या आनंदशक्तीने ते शरीर आकर्षक बनते. अशा या आनंदस्वरूप बाल प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी अयोध्येतील लोकांची गर्दी होऊ लागली होती. त्यावेळी एक दासी धावत -धावत येऊन कौशल्या मातेकडे गेली. त्यावेळी कौशल्येने तत्काळ आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार त्या दासीला दिला, मात्र त्या दासीने तो तसाच परत देऊन मला काही द्यायचे असेल तर रामाला माझ्या हातात दे हार नको, असे सांगितले. 
रामाचे शरीरच असे होते की, त्याला पाहिल्यास सर्व स्त्री-पुरुष मंडळी स्वत:ला विसरून जात होती. या रामाला पाहण्याकरिता साक्षात भगवान महादेवसुद्धा एका सामान्य माणसाचे रूप घेऊन अयोध्येत आले होते. प्रभू रामाच्या अवताराबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांचे देखील अवतारच होते. राम हा विष्णूचा, लक्ष्मण -शेषाचा, भरत शंखाचा तर शत्रुघ्न हा चक्राचा अवतार असल्याचे महाराजांनी शेवटी सांगितले. 
एकादशी असल्यामुळे सायंकाळऐवजी सकाळच्या सत्रात झालेल्या या प्रवचनासाठी बारामतीचे श्री महंत प्रमोद महाराज जगताप, पुण्याचे सदानंद महाराज बग, मुंबईचे अक्षय महाराज भोसले यांच्यासह गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२