Saturday 25 June 2016

श्रद्धा - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : || 
माणसाच्या भावना एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत.एकाच्याच ठिकाणी श्रद्धा ठेवणे त्याला जमत नाही.माणूस एखाद्याबद्दल एके काऴी प्रेम व्यक्त करतो ,तर कालांतराने त्याच्याबद्दलच द्वेषाची भाषा करतो. कारण माणसाच्या भावना स्वार्थापोटी निर्माण होतात आणि स्वार्थ साधला की, ती भावनाही नष्ट होते.परामार्थातही माणसाची भावना एका ठिकाणी राहत नाही.अनेक देवतांवर माणसांची भावना असते.त्या त्या देवतेसंबंधाने विशिष्ट प्रसंगामध्ये तो आपल्या भावना व्यक्तही करीत असतो.श्रीज्ञानेश्वरीमध्ये भगवान हे अज्ञानाचे लक्षण मानतात.तेराव्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात,
'एकादशीच्या दिवशी । जेतुला पाडू आम्हासी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशी ।। चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदासी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ।। पाठी सोमवार पावे । आणि बेलेसि लिंगा धावे । ऐसे एकलाचि आघवे । जोगावी जो ।।
माणूस प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करतो; पण एकाच्याही ठिकाणी स्थिर नाही.
' एको देव: केशवो वा शिवो वा ।' असे म्हटले जाते.माणसाने एकाचेच चिंतन करावे.
श्रीतुकाराम महाराजांनी देवाला म्हटले आहे, ' सर्व संगे वीट आला ।
तू एकला आवडसी ।।'
उपनिषदांनीही परमात्म्याचे वर्णन ' एकमेवद्वितीयम् ' असे केले आहे.स्वगतसजातीयविजातीय भेदशून्य असा एकच परमात्मा आहे.बाकीचे देव हेही स्वरूपाने तेच आहेत.तसे तर स्वरूपाने सर्व परमात्मास्वरूपच आहे.पण माणूस अघोरी देवतांचीही उपासना करतोच.कारण माणूस प्रेमापेक्षा भीतीनेच त्यांची भक्ती करतो.श्रीतुकाराम महाराज तर स्पष्ट म्हणतात,
' शेदरी हेंदरी दैवते । कोण ती पूजी भूतखेते । आपुल्या पोटाजी रडते । मागती शिते अवदान ।।'
यांना संत देवच मानत नाही,जीवच मानतात.भागवतात म्हटले आहे,
मुमुक्षवो घोररूपान्हित्वा भूतपतीनथ । नारायणकला: शान्ता भजन्ति ह्यनसूयव:।। मुमुक्षूने अघोरी देवतांची भक्ती न करता केवऴ नारायणाचेच चिंतन करावे.एकातच समाधान असते.


संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.