Saturday 25 June 2016

वक्रदृष्टी - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु  : ||

असे म्हणतात की देवाने माणसाची निर्मिती केली आणि देवालाच समाधान झाले.माणूस परिपूर्ण नाही, पण परिपूर्ण होण्याचे सामर्थ्य देवाने केवऴ माणसालाच दिले आहे.माणूस गुणसंपन्न होऊ शकतो.याचा अर्थ केवऴ माणसाकडेच गुण असतात,इतर प्राण्यांकडे काहीच नसतात असे नाही.जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर माणसाने ज्यांच्याकडून काही गुण घ्यावेत असे अनेक प्राणी आहेत.जे चांगले ते कोठून घ्यावे . ' बालदपि सुभाषितं ग्राह्यम् ' असे म्हटलेले आहे. केवऴ प्राण्यापासून नव्हे तर पृथ्वी , वृक्षादिकांच्या ठिकाणीही चांगले गुण आहेत. 


' जो खांडावया घावो घाली । का लावणी जयाने केली । दोघा एकचि सावली । वृक्ष दे जैसा ।।' 
हा क्षमा नावाचा गुण वृक्षात श्रीज्ञानदेवांना मिऴाला. कोणत्या प्राण्या-पक्ष्यांपासून कोणते गुण घ्यावेत याचा कौटिल्यांनी व चाणक्यांनी फार सुरेख विचार केला आहे.प्रभूतमल्प कार्यं वा याे नर : कर्तुमिच्छति । सर्वारंभेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते ।।

कार्य लहान असो वा मोठे , ते पूर्ण सर्व सामर्थ्याने करावे हे सिंहाकडून शिकावे.

इंद्रियाणिच संयम्य बकवत् पंडितोनर : । देशकाल बलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत् ।।
बुद्धिमान माणसाने बगऴ्यापासून इंद्रियांचे संयमन,देश,काल,बलाचा विचार करून कार्यसिद्धी करणे हे गुण जाणावे.

सुश्रांतॊऽपि वहेद्भारं शितोष्णं न च पश्यति । ससंतोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात् ।।
अतिशय श्रांत असूनही ओझे वाहणे,काम करताना शितोष्णाची पर्वा न करणे आणि सर्वदा संतुष्ट असणे हे गुण गाढवापासून घ्यावेत.

प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बंधुषु । स्वयमाक्रम्य मुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ।।

योग्य वेऴी जागे होणे, युद्धासाठी नेहमी तयार असणे,सर्वांनी मिऴून खाणे- सर्वांना समान भाग देणे,प्रसंगी आक्रमक होणे हे गुण कोंबड्यापासून घ्यावेत.

गूढ मैथूनचारित्वं काले काले च संग्रहम् । अप्रमत्तविश्वासं पन्च शिक्षेच्च वासयात् ।।
गुढ मैथुन, भविष्याकडे दृष्टी ठेवून संग्रहीवृत्ती ,आऴसाचा त्याग,सावधानता आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे कावऴ्याचे गुण आहेत.आणि 'बव्हाशी
स्वल्पसंतुष्ट : सुनिद्रो लघुचेतन : । स्वामिभक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणा : ।।'
अधिक अन्नाची गरज पण अल्पसंतुष्टता, गाढ झोप पण लवकर जाग येणे, स्वामिभक्ती, आणि शौर्य हे गुण कुत्र्याचे घ्यावेत.जगात गुण पुष्कऴ आहेत. दृष्टी गुणग्राहक असावी.सगऴीकडून चांगले घ्यावे !


संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर