Saturday 2 July 2016

आम्हां विठ्ठल एकचि देव - श्रीगुरु पु.ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

संतांनी आपल्या वाङ्मयामधून श्रीक्षेत्र पंढरीचे महत्व मोठ्या प्रमाणामध्ये वर्णिले आहे.पापविनाशक, पुण्यकारक,योगपीठ, मोक्षदात्री अशी परिणामदृष्टीने ही भूमी संपन्न असल्याची अनेक प्रमाणे सर्वच संतांनी सांगितले आहे.आणि म्हणून आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणा-या भक्तिरसाच्या सेवनासाठी आणि तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व संतक्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये येतात.जगत्कल्याणाची तऴमऴ घेऊन जमणारी ही मांदियाऴी अनवरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे.करीत आहे !
हीच वारी आहे. वारी म्हणजे सर्वात्मकाची स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा,सर्व संतांचे स्नेहमिलन,समष्टीकल्याणाची भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे,उपासकांनाच नव्हे,तर उपस्यालाही भावविभोर करणारी सर्वजनसुलभ अशी साधना आहे, वारकरी संप्रादायाचे हे वैशिष्ट्यच आहे, की येथे सर्वांना सर्व मिऴण्याची व्यवस्था आहे.

' यारे यारे लहानथोर ।
यातीभलते नारीनर ।
करावा विचार ।
न लगे चिंता कोणासी ।।'

असे अभिवचन श्रीतुकाराम महाराजांनीच दिलेले आहे.त्यामुऴे जातपात,धर्म,देश वगैरे भेदकारणांना बाजूला ठेवून सर्व जण येथे येतात.आणि सर्व विसरून एका आनंदामध्ये सुस्नात होत राहतात.'श्रीज्ञानेश्वरी' मध्ये म्हटले आहे,

' उठतिया आत्मप्रथा ।
हे भूतभेदव्यवस्था ।
मोडीत मोडीत पार्था ।
वास पाहे ।।'

हाच अनुभव वारीमध्ये अपेक्षित आहे आणि हेच संप्रदायाचे वैभवही मानले आहे.संत श्रीतुकाराम महाराजांनी हा अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे,

'वर्णाभिमान विसरली याति ।
एकएका लागतील पायी रे ।
निर्मऴ चित्ते झाली नवनीते ।
पाषाणा पाझर सुटती रे ।।'

किंवा,

' नर नारी याति हो कोणी भलती ।
भावे एका प्रीती नारायणा ।।'

म्हणूनच समाजातील सर्व घटक येथे एकोप्याने,समभावाने नांदतात,आनंद देतात-घेतात.येथे नरहरी महाराज,सावता महाराज,गोरोबाकाका,रविदासमहाराज असे विभिन्न जातींत अवताराला आलेले संत एकत्र येतात.त्यांचे प्रवृत्तीधर्मकार्य भिन्न असले तरीही येणा-या पारमार्थिक अनुभवामध्ये तरतमभाव नाही.सर्वांचा अनुभव एकच आहे आणि समाजकल्याणाची तऴमऴही सारख्याच तीव्रतेची आहे.विभिन्नतेमध्ये असणा-या एकतेची जाणीव करून देणे,हेच वारकरी संप्रदायाचे कार्य आहे आणि वारी हे त्याचे परिपक्व व्यापक असे रूप आहे.सर्वांमध्ये समानतेने,एकरूपतेने नांदणा-या भगवंताचे दर्शन हीच वारी !

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

- varkariyuva.blogspot.in