Thursday 14 July 2016

बरवे बरवे पंढरपूर । विठोबारायचे नगर ।।

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

 माझे कुळीचे दैवत।बाप माझा पंढरीनाथ।

पंढरीसी जाऊ चला।भेटू रखुमाई विठ्ठला ।।

संत नामदेवरायांचा हा अभंग उच्चारला की साक्षात विठुरायाची भेट होते.हेच वारकऱ्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण आहेत.कित्येकांना हे उद्गार भाबडेपणाचे वाटतील,पण आम्हां वारकऱ्यांना  मात्र हा भाबडेपणादेखील आवडतो.कारण त्यात जीवनाला शक्ती देणारी भावना आहे.जो श्रद्धेनं जगतो त्याच्या जीवनाला समाधानाची बैठक प्राप्त होते.त्याच्या आयुष्याला सुंगधी मोहोर येतो.आपले सुखदुःख आपल्या आराध्य दैवताच्या इच्छेवर अवलंबून आहे.ते दैवत जे पदरात टाकील ते आपल्याला स्वीकारायचं आहे ही श्रद्धा अशा माणसाला जगवते. पंढरी हा शब्द जरी नुसता उच्चारला तरी असंख्य माणसांचे हात नमस्कारासाठी जोडले जातात.या भक्तीला अर्थ आहे.या भक्तीला सामर्थ्य आहे.आपल्या शक्तीवर माणसं जगू शकत नाहीत.पण देवाविषयीची श्रद्धा जगायला बळ देते.ईश्वरनामाचं औषध घेऊन आरोग्यसंपन्न होण्यात काय चूक आहे हा प्रश्न बुद्धीवादी लोकांना विचारला पाहिजे.त्याच तर्कसंगत उत्ते देखील देऊ शकणार नाहीत.

अशीच श्रद्धा आणि निष्ठा पायीवारी कशी पार पडते ते समजू ही देत नाही.पंढरपूरात प्रवेश केल्यानंतर कळस दिसल्यानंतरचा जो आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो तो आनंद इतर ठिकाणी भेटेल काय ?

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ।।

सर्व संतांची मांदियाळी आज भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरीत दाखल ! सर्व भाविक भक्तांचे  श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये   वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या वतीने मनस्वी  हार्दिक स्वागत ....!

Varkariyuva.blogspot.in