Monday 18 July 2016

बॊलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
आज सर्व संतक्षेत्रातून आलेल्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये प्रविष्ट झाल्या आहेत.सर्वत्र प्रसन्नतेचे , आनंदाचे वातावरण आहे.वारकरी संत आणि देवाच्या भेटीने सद्गदित,तृप्त होत आहेत. 'एक एका लागतील पायी रे',हे चित्र सर्वत्र दिसते आहे; परंतु या सर्वांमध्ये सर्वांत आनंद जर कोणाला होत असेल तर तो भगवान श्री पंढरीनाथांस ! आज भगवंताचे सर्व लाडके भक्त त्याच्यासाठी एकत्र आले आहेत.यापेक्षा आनंद देवास तरी कोणता असावा ? म्हणूनच श्रीनामदेवरायांजवऴ भगवान विनंती करतात-
' आषाढी,कार्तिकी विसरू नका मज ।'
वारक-याच्या भेटीत देवासही आनंद वाटावा,अस वारक-यांत काय विशेष आहे ? ते म्हणजे वारक-याचे जीवन विठ्ठलमय असते म्हणून ! वारकरी श्रीपंढरीनाथाशिवाय अन्य काही मानत नाही.स्वत:चे सर्वस्व तो भगवंतास समर्पित करतो." मनेसहित वाचा काया । अवघे दिधले पंढरीराया ।।" हाच भाव त्याच्या अंत:करणामध्ये असतो.अर्थात,हे समर्पण एका क्षणांत होत नसते.परंपरेने चालत आलेल्या वारीचे सश्रद्ध आणि निष्ठावंत साधना,संतवाङ्मयाचे अंतर्मुख होऊन डोऴसपणे केलेले चिंतन आणि परमार्थाच्या वैचारिक अधिष्ठानावर कर्मयोगाशी न घेतलेली फारकत हे सर्व त्यांस कारण ठरते आणि हेच वारकरी जीवन होय.कर्म,ज्ञान आणि उपासनेची ही त्रिसुत्री वारक-यांच्या जीवनांत एकत्रित झालेली दिसते.
जीवनाची ही झालेली एकलंबनत्मकता हेच मानवी जीवनाच्या सुखाचे रहस्य आहे.दुर्दैवाने वा प्रपंचाची आवश्यकता म्हणून मनुष्य आपल्या जीवनामध्ये परिवर्तनीय,सुखाचा आभास निर्माण करणारी आणि प्रगल्भ विचारापुढे तुच्छ ठरणांरी ध्येय ठेवतो.त्याच्या प्राप्तीमध्ये अंतोगत्वा दु:ख भोगतो;पण खरा वारकरी मात्र आपल्या जीवनाचे ध्येय विठ्ठलभक्तीशिवाय अन्य काही ठेवत नाही,याचा अर्थ तो प्रपंच करीतच नाही, असे नाही.तर आपला प्रपंचच तो भावबऴाने विठ्ठलमय करतो.यासाठी त्याच्याकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेला उपाय आहे-

बॊलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।

करावा विठ्ठल जीवभाव ।।

येणे सॊसे मन झाले हावभरी ।

परत माघारी येत नाही ।।

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.