Tuesday 22 November 2016

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कार्तिक वारी वृत्त ...!

शके १२१८ कार्तिकवारीचे संत ज्ञानेश्वरांच्या दिंडीचे वर्णन एका अभंगात आले आहे .

कार्तिक एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ।।
येथील महिमा वर्णू कैसी । ब्रह्मादिका न वर्णवे ।। ०१
दिंड्या गरुडटक्यांचे भार । मृदूंग वाजती अपार ।।
वैष्णव नाचती जय जय कार । नादे अंबर गर्जतसे ।।०२
बरवे समतुल्य वाळुवंट । वरी वैष्णव मिळाले घनदाट ।।
करिती हरिनामाचे बोभाट । वीर उदभट विठ्ठलाचे ।।२३

संत नामदेव गाथा अभंग क्र ४२६ व ४१९ (श्रीसकलसंतगाथा)

संत ज्ञानेश्वर आता लवकरच समाधी घेणार असल्याने सर्वच देशातून त्यांचे शेवटचे दर्शन व कीर्तन ऐकण्यास जिकडून तिकडून लोक आले होते व सर्व संत ही कार्तिकीच्या वारीला आले होते. असे सर्व संत वाळवंटात गोळा झाले असता संत नामदेवाना वाटले , आपण या संतांच्या भेटीस जाऊन आलिंगन द्यावे .
धाऊनिया मिठी घालीन संत चरणी । सांगेन वचनी मनिचे गुज ।। १।।

एकादशीचे कीर्तन संत ज्ञानेश्वरांनी केले . हे त्यांचे शेवटचे कीर्तन होते . त्यांच्या किर्तनास लाखो लोक जमले होते . द्वादशीचे क्षिरापतीचे कीर्तन संत नामदेवांनी केले.या यात्रेस कबीरही आले होते . नामदेवमहाराज असले म्हणजे ज्ञानेश्वरमहाराज त्यांनाच किर्तनास उभे करीत असत. तसेच याही वेळी संत नामदेव किर्तनास उभे राहिले व ज्ञानेश्वर स्वतः टाळ घेऊन उभे राहिले.सर्व संत मंडळीही टाळ घेऊन उभी राहिली . सर्व श्रोते व भक्तगण बसून कीर्तन ऐकू लागले. टाळ मृदूंग एका तालात वाजत होते . त्यामुळे कीर्तनाला खूपच रंग आला जनाबाई म्हणतात ' ज्ञानदेवा ! आता तुम्ही एक अभंग म्हणा .' जनाबाईंच्या म्हणण्यावरून ज्ञानेश्वरमहाराजांनी अभंग म्हटला तेव्हा खूपच रंग भरला . त्यामुळे देव देहभान विसरून प्रेमाच्या भरात नाचू लागले , त्यात त्यांचा पितांबर गळून पडला . तेव्हा कबीर महाराज म्हणतात , देवा सावध व्हा.'

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचु लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ । जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संताच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥
(संत जनाबाई गाथा अभंग क्र  २६५)

तेव्हा ज्ञानोबांनी देवाचे मनगट धरले व पितांबर नेसा असे सांगितले . नंतर ज्ञानेश्वरांनी काल्याचा अभंग म्हणून सर्व संत मंडळीस काला वाटला.
काला करिती संतजन । सवे त्यांच्या नारायण।।
वाटी अपुल्या निजहस्ते। भाग्याचा तो पावे येथे ।।
लाही सित लागे हाती । दोष देखोनिया त्या पळती ।।
निळा म्हणे क्षीराचा बुंद । लागता पावे ब्रह्मानंद ।।

हा पंढरपूरला शेवटचा काला वाटून ज्ञानेश्वर समाधी मागण्यास पांडुरंगाच्या मंदिरात जातात.

संत ज्ञानेश्वरांच्या जीवनात भक्तीचे खूप सोहळे झाले . भक्तिज्ञानाचा आनंद त्यांनी पूर्ण घेतला व हजारो लोकांस कृतार्थही केले. तसेच भावी पिढीकरिता श्री ज्ञानेश्वरी , गाथा , हरीपाठादी १९ ग्रँथ व पंढरीची वारी , भजन , कीर्तन , दिंडी , हरिजागर , काला इत्यादी साधने करून ठेवली . शहाणे लोक काम संपल्यावर राहत नाहीत . संत ज्ञानेश्वरमहाराज व मुक्ताबाई आदी भावंडे कृतकार्य झाली होती . त्यामुळे त्यांनी आपली शरीरयात्रा संपवावी , अशी इच्छा झाली व समाधी मागण्याकरिता पांडुरंगाच्या मंदिरात आले व दर्शन करून म्हणाले -

ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी । समाधानी तूंचि होसी ।
परी समाधी हे तुझपाशी । घेईन देवा ।।१।।
नलगे मज भुक्ती । नलगे मज मुक्ती ।
तुझ्या चरणीं आर्ती । थोर आथी ।।२।।
या प्रमाणे प्रार्थना केल्यावर देव - भक्तांचा बराच संवाद झाला. ज्ञानेश्वर महाराज समाधी मागतात , हे ऐकून नामदेवास फार दुःख झाले.

नामा उभा असे सन्मुख । एकता थोर खेद दुःख ।
म्हणे ज्ञानांजन महासुख । समाधी मागतसे ।। ८।।

(नामदेव महाराज गाथा ९७४)
पांडुरंगाने संत ज्ञानेश्वरांचे म्हणणे ऐकून घेतले व सांगितले की , तुम्ही आता लवकर अलंकापुरी जावे व येत्या वद्य त्रयोदशीस समाधी घ्यावी . याप्रमाणे पांडुरंगाची आज्ञा घेऊन ही भावंडे ताबडतोब आळंदीला गेले.

श्रीक्षेत्र पंढरपूर हुन संत श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले आता पाहू आळंदी येथील वर्णन ..

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in