Tuesday 22 November 2016

माझ्या माउलींची विरहीणी


पडलें दूर देशी मज आठवे मानसीं ।
नको नको हा वियोग, कष्ट होताति जिवासी ॥ १ ॥
दिनु तैसी रजनी जालिगे माये ।
अवस्था लावूनी गेला, अझुनी का न ये ॥ २ ॥
गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा ।
बापरखुमादेविवरा, श्रीविठ्ठला ॥ ३ ॥

वरील अभंगामध्ये माउलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: ‘तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनात प्रकर्षाने येत आहे. हा वियोग अतिशय कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे (१). हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे (माझे सर्व जिवन उध्वस्त झाले आहे), ही अवस्था झालेली असतानासुध्दा तू अजून का येत नाहीस? (भक्‍ताच्या आर्त हाकेला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माउली भगवंतांना अशी हाक देत आहे!) (२). अरे सर्वगुणसंपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंतांचे वाहन आहेस तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्रीविठ्ठलांना घेऊन ये (३).’

बघा, माउलींचे मन विरहवेदनेने किती वेडेपिसे झालेले आहे! जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपले पाय पुढे ठेवित नाही अशा सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपणाजवळ आण अशी विनवणी करण्यास ते तयार झाले आहेत. जेव्हा मनाची अवस्था केविलवाणी झालेली असते तेव्हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ या न्यायाने आपण कितीही अशक्य असलेल्या गोष्टींचा आधार घेतो तशीच अवस्था प्रत्यक्ष माउलींची झालेली आहे. श्रीसंत तुकाराम महाराजसुध्दा आपल्या ‘गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळां डोई’ या अभंगामध्ये गरुडाला, लक्ष्मीला आणि शेषाला विनवणी करतात की तुम्ही तरी भगवंताला माझ्याजवळ आणा. संतांच्या या सकृतदर्शनी विरोधाभासी वर्तनावरुन ते किती व्याकुळ झाले असतील याची थोडीफार कल्पना करण्याचा प्रयत्‍न आपण करु शकतो. आपल्या हातात एवढेच आहे कारण त्यांच्या मनःस्थितीची आपणास जाणीव होणे निव्वळ अशक्य आहे!

शेवटी या अभंगाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की माउलींना झालेली विरहवेदना आपल्या दृष्टीने एक क्षणभरही टिकलेली नसणार. परंतु त्यांच्या मनाच्या पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे तो अत्यल्पकाळसुध्दा त्यांना नकोसा वाटतो. दुःखाचे मोजमाप ते कितीकाळ टिकले यावर करायचे नसते, तर त्याने मनात किती खोल जखम झाली आहे यावर करायचे असते हे आपण नजरेआड करु नये.


वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Varkariyuva.blogspot.in