Sunday, 22 May 2016

असा असेल यंदाचा श्री माउलींचा पालखी सोहळा

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शके १९३८ सन २०१६
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर 
श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम 

ज्येष्ठ वद्य ८ अष्टमी मंगळवार दि .२८ जून २०१६ ते आषाढ कृ.११ शनिवार दि ३० जुलै २०१६

आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा २८  जून २०१६  रोजी होणार आहे. विविध मुक्कामांनंतर १४ जुलै  २०१६ रोजी पालखी सोहळा पंढरीत प्रवेश करेल, अशी माहिती पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी दिली. यंदा माउलींचा पालखी सोहळा वाल्हे आणि माळशिरस येथे गावातून न जाता थेट मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर विसावणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, यंदा माउलींची पालखी वाहून नेण्याचा मान आळंदी येथील संतोष वहिले यांच्या बैलजोडीला मिळाला आहे.

असा असेल यंदाचा माउलींचा पालखी सोहळा

● २८ जून २०१६ आळंदीतून प्रस्थान ०४ वा प्रस्थान , पहिल्या दिवशीचा मुक्काम देवस्थानच्या आजोळघरी (गांधीवाडा - दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान )
● २९  जूनला २०१६  दुस-या दिवशी हा सोहळा पुण्याच्या दिशेने दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ  (१-  थोरल्या पादुका २ - भोसरी फाटा ) दुपारी - फुलेनगर  दुपारी विसावा - सँगमवाडी रात्री - पालखी विठोबा मंदिर , भवानी पेठ , पुणे
● ३० जून २०१६  दिवसभर पुणे मुक्काम
● ०१  जुलै २०१६ - सकाळी - शिंदेछत्री -  हडपसर  - उरळी देवाची - वडकिनाला -  झेंडेवाडी - दिवे घाटातून मार्गस्थ होत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवडला
● ०२ जुलै २०१६दिवसभर  सासवड मुक्काम
● ०३  जुलै २०१६ बोरावके मळा - यमाईशिवरी - साकुर्डे -  जेजुरीत मुक्काम
●  ०४   जुलै२०१६  दौंडज शिव - दौंडज -वाल्हे मुक्काम
● ०५ जुलै२०१६  पिंपरे खुर्द विहीर - नीरा - श्रींचे नीरा स्नान - लोणंद मुक्काम
●  ०६  जुलै २०१६ चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले -   तरडगाव मुक्काम
●  ०७  जुलै२०१६  दत्तमंदिर काळज - सुरवडी - निभोरे ओढा - वडजल - फलटण मुक्काम
● ०८   जुलै २०१६  विडणी - पिंपरद - निंबलक फाटा - बरड
● ०९  जुलै २०१६ साधुबुवाचा ओढा - धर्मपुरी - कारुंडे - शिंगणापूर फाटा - पानसकरवाडी - नातेपुते मुक्काम
●  १०  जुलै२०१६  मांडवी ओढा - सदाशिव नगर गोल रिंगण १ ले - येळवी -  माळशिरस मुक्काम
●  ११ जुलै २०१६ खुडूसफाटा गोल रिंगण २ रे - विंझोरी - धावबावी माउंट -  वेळापूर मुक्काम
●  १२  जुलै २०१६ ठाकूरबुवा समाधी गोल रिंगण ३ रे - तोंडलेबोंडले - टप्पा ( संत सोपानदेव भेट ) भंडीशेगाव मुक्काम
●  १३  जुलै २०१६ बाजीरावाची विहीर उभे रिंगण २ रे व गोल रिंगण ४ थे   वाखरी 
● १४ जुलै  २०१६  पादुकाजवळ आरती - व उभे ३ रे रिंगण - पालखी सोहळा पंढरीत विसावेल .

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
varkariyuva.blogspot.in

वारी संदर्भातील विशेष माहितीकरिता आजच वरील लिंक ला भेट द्या .

Wednesday, 16 March 2016

शांतीब्रह्म श्री एकनाथमहाराज यांची गुरूपरंपरा

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
आपण आज पाहणार आहोत संत श्री एकनाथ महाराज यांची गुरुपरंपरा 

आदीनारायण हे एकनाथांच्या गुरुपरंपरेचं मूळ. आदीनारायण - ब्रह्मदेव- अत्रि - दत्तात्रेय- जनार्दन - एकनाथ अशी नाथांची गुरुपरंपरा होय.
आदीनारायण - जे निर्गुण निराभास असून शबलब्रह्माची उत्पत्ती ज्यापासून झाली ते आदीनारायण प्रस्तुत परंपरेचे आद्यगुरु.
नाथ म्हणतात - जो निर्गुण निराभास । जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास ।
आदीनारायण म्हणती ज्यांस । तो सर्वांसी आदीगुरु

ब्रम्हदेव (विधी) - सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवास ब्रह्मज्ञान न झाल्यानं तो नारायणास शरण गेला. नारायणाने त्यांस उपदेश दिला.
नाथ म्हणतात - नकळे नकळे ब्रम्हज्ञान । म्हणोनि धरितसे चरण ।
नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥ अ.क्र.१८९९

अत्री - दत्तात्रेयांचे पिता अत्रिऋषींना ब्रह्मदेवाकडून ते ज्ञान प्राप्त झालं.
नाथ म्हणतात - ब्रह्मा अत्रीते सांगत । ब्रह्मज्ञान हृदयी भरीत ।

दत्तात्रेय - अत्रीऋषींकडुन भगवान दत्तात्रेयांस त्या ज्ञानाची प्राप्ती झाली.
नाथ म्हणतात - ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला ।
तो शेष लाभला दत्तात्रय ॥

जनार्दनस्वामी - जन्म फाल्गून व.६ शके १४२४ तथा इ.स. १५०२ निर्याण-फाल्गून व ६ शके १४९७ तथा इ.स.१५७५
जनार्दनस्वामी हे चाळीसगांवचे देशपांडे. ते दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याचे किल्लेदार होते. मुस्लिम राजवटीत शुक्रवार हा सुट्टीचा दिवस असताना स्वामींच्या प्रभावाने गुरुवार हा सुट्टीचा दिवस म्हणून पाळत. भगवान दत्तात्रेयांनी तीन शिष्य केले, पहिला सहस्त्रार्जुन, दुसरा यदु आणि तिसरा जनार्दन.
नाथ म्हणतात - दत्तात्रेय कृपे पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान ॥
जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रेय दातारु ॥
दत्तात्रय कृपा । केली जनार्दनी ॥
दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा ।
जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥
नाथकृत व इतर उल्लेखांवरुन, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या एकनाथी परंपरेवरुन भगवान दत्तात्रय हेच जनार्दन स्वामींचे गुरु आहेत असे सिद्ध होते.

एकनाथमहाराज - फाल्गुन वद्य ६ ह्या दिवशी नाथानां स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. ६ वर्षे नाथांचे वास्तव्य जनार्दन स्वामींकडे दौलताबादी होते. स्वामींनी नाथानां शुलिभंजन पर्वताच्या परिसरात दत्तात्रेयांचे दर्शन घडविले.
स्वामी नाथानां उपदेश करतांना म्हणतात -
सर्वांभूती भाव नको ठेऊ दुजा । तेणे गरुडध्वजा समाधान ॥१॥
संतांसी नमन आलिया अन्नदान । यापरते कारण आणिक नाही ॥२॥
सर्वभावे वारी पंढरीची करी । आणिक व्यापारी गुंतु नको ॥३॥
म्हणे जनार्दन घेई हाचि बोध । सांडोनि सर्वदा द्वेष भेद ॥४॥

अर्थात सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी ठेव. कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही अशी भावना ठेवल्याने भगवंतास समाधान प्राप्त होणार आहे. संतांच्या चरणी नम्र रहा, घरी येणाऱ्या प्रत्येकास अन्नदान कर, इतर गोष्टींमध्ये न अडकता अंत:करणपुर्वक पंढरीचीवारी करीत जा, सर्वप्रकारचा द्वेषभेद यांचा तु त्याग कर हाच बोध माझ्याकडून तु घे असे जनार्दन स्वामींनीं सांगितले. नाथांनी नेटकेपणानं या उपदेशाचं पालन करुन आपल्या अनेक शिष्यांना आचरणाद्वारे उपदेशित करुन उपकृत केले. जनार्दनी कॄपेस्तव जाण। समूळ निरसले भवबधंन एकाजनार्दनी शरण। झाली संपूर्ण परंपरा ॥

शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराजांचा ४१७ वा जलसमाधी महोत्सव, श्रीक्षेत्र पैठण घर बसल्या अनुभवा फेसबुक द्वारे

#PaithanWari #SelfiWithPaithanchaWarkari #EknathShashthi या HashTag चा वापर करा.

निळाम्हणे जया घडे तेथिल वारी |
तया पुण्यासही न वर्णवे ||
कृष्णकमला तीर्थी चरण नाथांचे |
उद्धरी जगाचे कलिदोष ||

आजच आणि  आताच लिंक ला भेट द्या आणि JOIN व्हा .
https://www.facebook.com/events/532991070208748/

नियमित वाचा संत श्री एकनाथ महाराज यांच्या जीवनाशी तथा वाड्मयाशी निगडीत अनेक मार्मिक आणि अभ्यासपूर्वक लेख
विशेष सहकार्य :
ह.भ.प.योगीराजमहाराज गोसावी , पैठण
शांतीब्रह्म संत एकनाथमहाराज मिशन

आपले नम्र ,
संत एकनाथमहाराज भक्त परिवार 
Varkariyuva.blogspot.in

साध्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

 एखादे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी जे नियत साधन प्राप्त झालेले असते, त्या साधनाने ते साध्य प्राप्त करून घेणेच इष्ट होय.अन्यथा त्या साधनांचा दुरूपयोग केल्यासारखे होईल.कारण ब-याच वेऴा माणूस साधनांकडून प्राप्त होणा-या क्षणिक आणि सामान्य सुखांमध्ये इतका गुंतून जातो,की मूऴ साध्याचा त्याला विसर पडतो.आपल्या इंद्रियांचेही असेच आहे. श्रीतुकाराम महाराजांनी आपणास त्याची जाणीव करून दिली आहे.
दिली इंद्रिये हात पाय कान । डोऴे मुख बोलाय वचन । जेणे तू जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ।
वास्तविक आपणांस इंद्रिये दिली ती परमार्थ करण्यासाठी, पण आपण त्यांचा उपयोग विषयांच्या उपभोगासाठी करतो.कारण त्या विषयांपासून इंद्रिये क्षणिक सुखाची प्राप्ती करून देतात श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रियांचा स्वभाव सांगताना म्हटले आहे,
या विषयावाचोनि कांही । सर्वथा आणिक रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ।।
त्या इंद्रियांना परमार्थाकडे वऴवावे लागते.तेही सोपे नाही.त्यासाठी अभ्यास,वैराग्य, वगैरेंची आवश्यकता मानली आहे.पण मुऴात आपले साध्य,आपली इंद्रिये यांचा आपण विचार केला पाहिजे.
भर्तृहरींनी नीतिशतकात हेच स्पष्ट केले आहे,
श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कंकणेन । विभाती काय: खलु सज्जनानां परोपकारैर्न तु चंदनेन ।।
कानाची शोभा श्रवणात आहे; कुंडले घालण्यात नाही,हाताची शोभा दान करण्यात आहे ; कंकणात नाही,सज्जनांचे सर्व शरीर परोपकारासाठी आहे;भोगासाठी नाही.म्हणजे आपल्या इंद्रियांच्या कार्याची योग्य जाणीव आपणास हवी.इंद्रिये परमार्थाकडे प्रवृत्त करून परोपकार करणे हाच पुरूषार्थ आणि सज्जनतेचे लक्षणही !
***
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

स्तुती - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला आवडते.देहभान विसरून माणूस स्वत:चे वर्णन ऐकत असतो.वर्णन करणारेही पुष्कऴ असतात.आपणांस एखाद्याकडून काही प्राप्ती होणार आहे असे कऴले,की माणूस त्यांचे वर्णन करतोच.पण त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही.वर्णन दोन प्रकारचे असते.एक यथार्थ आणि दुसरे अयथार्थ ! यथार्थ वर्णन ज्ञानातून होते आणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्णन करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला,तरी ते वर्णन योग्य असेलच असे नाही.पूर्वीच्या काऴात राजेमहाराजे आपल्यासाठी स्तुतीपाठक ठेवत असत.राजाचे वर्णन करण्यासाठीच त्यांना पैसे मिऴत असत.पण ते वर्णन वस्तुस्थितीला धरून केलेले असेलच असे नाही.आजही पैसे देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णणाचे मूल्य कोणाचे वर्णन केले जाते,वर्णन करणारा कोण आणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते.काही तरी गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही.ज्याचे वर्णन करायचे,तो खरोखरच गुणवान आहे का,याचा विचार केला पाहिजे.दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही चिंतन केले पाहिजे.कारण एखादा भिकारी रूपया भीक देणा-याचे 'कर्णाचा अवतार' म्हणून वर्णन करतो.भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही.एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन करतो याला मूल्य आहे.कारण ते ओऴखून जाणीवपूर्वक केलेले वर्णन असते.आपण ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करतो यातून त्यांचे मोठेपण सिद्ध होत नाही.नामदेवमहाराज,तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात,यातून त्यांचा मोठेपणा कऴतो. म्हणून वर्णन करणारा कोण आहे हे पाहिले पाहिजे आणि तिसरे,वर्णनाचा विषय काय यावरूनही त्याचे मूल्य ठरते.सद्गुणांचे वर्णन झाले तर योग्य अन्यथा 'अमुक अमुक चोरी फार सफाईन करतात ' असे वर्णन योग्य नाही ! वर्णन सद्गुणांचे असावे. तर ते महत्वाचे ठरते.पण सध्याची स्थिती वेगऴीच आहे. वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार सध्या होत नाही.सुभाषितात गमतीने म्हटले आहे,
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभा : ।
परस्परं प्रशंसन्ति अहॊ रूपं अहॊ ध्वनि: ।।
उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले.दोघांनी एकमेकांच्या रूपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे रूप , गाढवाचा आवाज ! सध्या असेच नाही का ?
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

कार्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणूस डोऴ्यांसमोर काही उद्दिष्ट ठेवून एखादे कार्य हाती घेत असतो.पण प्रत्येकाचे प्रत्येक कार्य पूर्णत्वाला जाईलच असे नाही.त्यात अनेक प्रतिबंध निर्माण होतात.त्या अडचणींना तोंड देतच माणसाला पुढे जावे लागते.काही वेऴा हे प्रतिबंध इतके तीव्र स्वरूपाचे असतात, की माणसाला स्वीकारलेले काम अर्ध्यावरच सोडून द्यावे लागते.माणसाचा निश्चय आणि प्रतिबंधाची तीव्रता यावर कार्याची परिपूर्णता अवलंबून असते.म्हणजे या दोन्हीपैकी जे प्रबल असते,त्यावरून कार्य पूर्ण होते अथवा अपूर्ण राहते.माणसाचा निश्चय किती दृढ आहे यावरून कार्य पूर्णतेला जाते.जर तो निश्चय प्रतिबंधासमोर टिकला नाही तर कार्य पूर्ण होणार नाही. यावरून भर्तृहरीने माणसाचे तीन प्रकार केले आहेत.नीतिशतकामध्ये ते म्हणतात,
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै: ।
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: ।
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:। प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ।।
विघ्न येतील म्हणून कार्याचा प्रारंभच न करणारे कनिष्ठ प्रतीचे लोक असतात. हे विघ्नाच्या किंवा संकटाच्या भयाने कार्याकडेच प्रवृत्त होत नाही.पक्षी धान्य खातील म्हणून ते न पेरण्याचा हा वेडेपणा होय.दुसरा वर्ग मध्यम प्रतीच्या लोकांचा,की जे कार्याचा प्रारंभ करतात पण प्रतिबंध आला की खचून जातात आणि कार्य अर्ध्यावरच सोडून देतात.हे निश्चयावर न टिकणारे लोक असतात.एक वर्ग असा आहे , की वाटेल त्या अडचणी आल्या तरी ते आपले कार्य पूर्ण करतातच.कारण त्यांचा निश्चय इतका दृढ असतो, की कोणताही प्रतिबंध त्यांना अडवू शकत नाही.श्रीतुकोबाराय देवालाच सांगतात,
मजवरी घाल घण ।
परि मी न सोडी चरण ।
यातून त्यांचा निश्चय प्रगट होतो.एकदा कार्य हातात घेतले की पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. हे उत्तम प्रतीचे लोक होत. मुद्राराक्षसातही अनेक उदाहरणे देऊन ' निर्वाहःप्रतिपन्नवस्तुषु' असे म्हटले आहे पंचतंत्रातही, 'अनारंभेहि कार्याणां प्रथम बुद्धिलक्षण '. आणि सुरू केलेले कार्य पूर्ण करणे हे दुसरे बुद्धिलक्षण म्हटले आहे.हाती घेतलेले तडीस नेणारे तेच उत्तम जन.
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.