Wednesday 16 March 2016

कार्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणूस डोऴ्यांसमोर काही उद्दिष्ट ठेवून एखादे कार्य हाती घेत असतो.पण प्रत्येकाचे प्रत्येक कार्य पूर्णत्वाला जाईलच असे नाही.त्यात अनेक प्रतिबंध निर्माण होतात.त्या अडचणींना तोंड देतच माणसाला पुढे जावे लागते.काही वेऴा हे प्रतिबंध इतके तीव्र स्वरूपाचे असतात, की माणसाला स्वीकारलेले काम अर्ध्यावरच सोडून द्यावे लागते.माणसाचा निश्चय आणि प्रतिबंधाची तीव्रता यावर कार्याची परिपूर्णता अवलंबून असते.म्हणजे या दोन्हीपैकी जे प्रबल असते,त्यावरून कार्य पूर्ण होते अथवा अपूर्ण राहते.माणसाचा निश्चय किती दृढ आहे यावरून कार्य पूर्णतेला जाते.जर तो निश्चय प्रतिबंधासमोर टिकला नाही तर कार्य पूर्ण होणार नाही. यावरून भर्तृहरीने माणसाचे तीन प्रकार केले आहेत.नीतिशतकामध्ये ते म्हणतात,
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै: ।
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: ।
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:। प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ।।
विघ्न येतील म्हणून कार्याचा प्रारंभच न करणारे कनिष्ठ प्रतीचे लोक असतात. हे विघ्नाच्या किंवा संकटाच्या भयाने कार्याकडेच प्रवृत्त होत नाही.पक्षी धान्य खातील म्हणून ते न पेरण्याचा हा वेडेपणा होय.दुसरा वर्ग मध्यम प्रतीच्या लोकांचा,की जे कार्याचा प्रारंभ करतात पण प्रतिबंध आला की खचून जातात आणि कार्य अर्ध्यावरच सोडून देतात.हे निश्चयावर न टिकणारे लोक असतात.एक वर्ग असा आहे , की वाटेल त्या अडचणी आल्या तरी ते आपले कार्य पूर्ण करतातच.कारण त्यांचा निश्चय इतका दृढ असतो, की कोणताही प्रतिबंध त्यांना अडवू शकत नाही.श्रीतुकोबाराय देवालाच सांगतात,
मजवरी घाल घण ।
परि मी न सोडी चरण ।
यातून त्यांचा निश्चय प्रगट होतो.एकदा कार्य हातात घेतले की पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. हे उत्तम प्रतीचे लोक होत. मुद्राराक्षसातही अनेक उदाहरणे देऊन ' निर्वाहःप्रतिपन्नवस्तुषु' असे म्हटले आहे पंचतंत्रातही, 'अनारंभेहि कार्याणां प्रथम बुद्धिलक्षण '. आणि सुरू केलेले कार्य पूर्ण करणे हे दुसरे बुद्धिलक्षण म्हटले आहे.हाती घेतलेले तडीस नेणारे तेच उत्तम जन.
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.