Wednesday 16 March 2016

साध्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

 एखादे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी जे नियत साधन प्राप्त झालेले असते, त्या साधनाने ते साध्य प्राप्त करून घेणेच इष्ट होय.अन्यथा त्या साधनांचा दुरूपयोग केल्यासारखे होईल.कारण ब-याच वेऴा माणूस साधनांकडून प्राप्त होणा-या क्षणिक आणि सामान्य सुखांमध्ये इतका गुंतून जातो,की मूऴ साध्याचा त्याला विसर पडतो.आपल्या इंद्रियांचेही असेच आहे. श्रीतुकाराम महाराजांनी आपणास त्याची जाणीव करून दिली आहे.
दिली इंद्रिये हात पाय कान । डोऴे मुख बोलाय वचन । जेणे तू जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ।
वास्तविक आपणांस इंद्रिये दिली ती परमार्थ करण्यासाठी, पण आपण त्यांचा उपयोग विषयांच्या उपभोगासाठी करतो.कारण त्या विषयांपासून इंद्रिये क्षणिक सुखाची प्राप्ती करून देतात श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रियांचा स्वभाव सांगताना म्हटले आहे,
या विषयावाचोनि कांही । सर्वथा आणिक रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ।।
त्या इंद्रियांना परमार्थाकडे वऴवावे लागते.तेही सोपे नाही.त्यासाठी अभ्यास,वैराग्य, वगैरेंची आवश्यकता मानली आहे.पण मुऴात आपले साध्य,आपली इंद्रिये यांचा आपण विचार केला पाहिजे.
भर्तृहरींनी नीतिशतकात हेच स्पष्ट केले आहे,
श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कंकणेन । विभाती काय: खलु सज्जनानां परोपकारैर्न तु चंदनेन ।।
कानाची शोभा श्रवणात आहे; कुंडले घालण्यात नाही,हाताची शोभा दान करण्यात आहे ; कंकणात नाही,सज्जनांचे सर्व शरीर परोपकारासाठी आहे;भोगासाठी नाही.म्हणजे आपल्या इंद्रियांच्या कार्याची योग्य जाणीव आपणास हवी.इंद्रिये परमार्थाकडे प्रवृत्त करून परोपकार करणे हाच पुरूषार्थ आणि सज्जनतेचे लक्षणही !
***
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.