Wednesday 16 March 2016

स्तुती - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला आवडते.देहभान विसरून माणूस स्वत:चे वर्णन ऐकत असतो.वर्णन करणारेही पुष्कऴ असतात.आपणांस एखाद्याकडून काही प्राप्ती होणार आहे असे कऴले,की माणूस त्यांचे वर्णन करतोच.पण त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही.वर्णन दोन प्रकारचे असते.एक यथार्थ आणि दुसरे अयथार्थ ! यथार्थ वर्णन ज्ञानातून होते आणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्णन करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला,तरी ते वर्णन योग्य असेलच असे नाही.पूर्वीच्या काऴात राजेमहाराजे आपल्यासाठी स्तुतीपाठक ठेवत असत.राजाचे वर्णन करण्यासाठीच त्यांना पैसे मिऴत असत.पण ते वर्णन वस्तुस्थितीला धरून केलेले असेलच असे नाही.आजही पैसे देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णणाचे मूल्य कोणाचे वर्णन केले जाते,वर्णन करणारा कोण आणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते.काही तरी गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही.ज्याचे वर्णन करायचे,तो खरोखरच गुणवान आहे का,याचा विचार केला पाहिजे.दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही चिंतन केले पाहिजे.कारण एखादा भिकारी रूपया भीक देणा-याचे 'कर्णाचा अवतार' म्हणून वर्णन करतो.भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही.एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन करतो याला मूल्य आहे.कारण ते ओऴखून जाणीवपूर्वक केलेले वर्णन असते.आपण ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करतो यातून त्यांचे मोठेपण सिद्ध होत नाही.नामदेवमहाराज,तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात,यातून त्यांचा मोठेपणा कऴतो. म्हणून वर्णन करणारा कोण आहे हे पाहिले पाहिजे आणि तिसरे,वर्णनाचा विषय काय यावरूनही त्याचे मूल्य ठरते.सद्गुणांचे वर्णन झाले तर योग्य अन्यथा 'अमुक अमुक चोरी फार सफाईन करतात ' असे वर्णन योग्य नाही ! वर्णन सद्गुणांचे असावे. तर ते महत्वाचे ठरते.पण सध्याची स्थिती वेगऴीच आहे. वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार सध्या होत नाही.सुभाषितात गमतीने म्हटले आहे,
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभा : ।
परस्परं प्रशंसन्ति अहॊ रूपं अहॊ ध्वनि: ।।
उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले.दोघांनी एकमेकांच्या रूपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे रूप , गाढवाचा आवाज ! सध्या असेच नाही का ?
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.