Tuesday 21 June 2016

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
वै.सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर....! श्रीरामपुर जवळ सध्या नगर जिल्ह्यात असणारे "बेलापूर" हे शाहु महाराजांचे मुळ गांव. शाहु महाराज म्हणजे सदगुरु सखाराम महाराज अंमळनेरकर यांचे पट्टशिष्य.शाहू महाराज बेलापुरकर एक थोर विद्वान आणि त्या काळातील एक भवदभक्त होते.महाराज दर वर्षी बेलापुर- पंढरपूर आषाढी वारी करत असत.सदगुरु
शाहू महाराज बेलापूरकर यांचे नातु वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर हेही परकोटीचे विद्वान आणि पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असणारे वारकरी..शाहु महाराजांनी घालुन दिलेली पंढरीची आषाढी वारी भानुदास महाराज निष्ठेने न चुकता करत.या सगळ्याबरोबरच भानुदास महाराज म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे एक पट्टशिष्य होते.त्यांची निवृत्तीनाथ महाराजांवर गाढ श्रध्दा होती.
मला माहीती आहे आता सगळे वाचक संभ्रमात पडले असतील कि,हा निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याबद्दल लिहतोय की बेलापुरकर महाराज फडपरंपरेवर.? मंडळी तुम्ही विचार करताय तस नाहीये.निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त असणाऱ्या बेलापूरकर महाराज परंपरेतील तिसरे सत्पुरुष वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर यांनीच निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सुरु केलाय.चला तर मग बघुयात पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा इतिहास..
आठरव्या शतकातील पुर्वार्धाचा तो काळ होता.त्या आधी आपण पाहील्याप्रमाणे सर्व संतांचे पालखी सोहळे अख्या महाराष्ट्रातुन आषाढीला पंढरीस जायला सुरुवात झाली होती. भानुदास महाराज बेलापुरकर हे निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त होते.महाराजांना अस मनात वाटल की,जर सर्व संतांचे पालखी सोहळे आषाढी ला पंढरीला जात असतील. तर मग निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरीस का जात नाही? पालखी सोहळा काढायचा हा विचार करुन सदगुरु भानुदास महाराज त्रंबकेश्वर ला गेले खरे पण त्या काळी त्रंबकेश्वर येथे अनेक संतांच्या समाध्या होत्या.सदगुरु भानुदास महाराजांनी हे तिथे गेल्यावर पाहीलं.त्यांना कळेचा ना की निवृत्तीनाथांची समाधी कोणती? शेवटी सदगुरु भानुदास महाराजांनी जो पर्यंत समाधी कोणती सापडत नाही .तोपर्यंत त्या असंख्य समाध्यांसमोर अन्नपाण्याविना अनुष्ठान करण्याचे ठरविले.आणि भानुदास महाराज अनुष्ठाला बसले.अनुष्ठान काही दिवस चालले.आणि एक दिवशी अचानक एक छोटी मुलगी तिथे शेळ्या घेऊन आली.तिने भानुदास महाराजांना पाहील आणि त्यांना विचारल,"बाबा इथे काय करताय?" महाराजांनी तिला काहीच सांगीतल नाही.शेवटी ती पोरं हट्टाला पेटल्यावर महाराज म्हणाले,"बाळा मी संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी शोधतोय."
ती मुलगी लगेच म्हणाली.'अहो हे काय आत्ताच मी फुलं वाहुन आलीय त्या समाधीला'
ती एवढी बोलली आणि क्षणार्धात गुप्त झाली. ती साक्षात योगमायाच होती हे भानुदास महाराजांनी जाणल. तिला शोधल पण ती गायबच झाली.
सदगुरु भानुदास महाराज तद्नंतर समाध्यांकडे आले.तेव्हा त्यांना एका समाधीवर फुले वाहिलेले दिसले.तीच आजची आपण दर्शन घेतो ती आजही ब्रह्मगीरीच्या पायथ्याशी असलेली निवृत्तीनाथ महाराजांची समाधी!
त्यावेळीच भानुदास महाराजांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचा गाभारा "पेशव्यांच्या" आर्थिक साहय्याने बांधुन घेतला.आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका स्थापन करुन त्याच पादुका आषाढीला पंढरीस आणण्यास सुरुवात केली.ते साल म्हणजे इ.स १८४० होत. आणि ती तिथी म्हणजे आजचीच "जेष्ठ वद्य प्रतिपदा"
आता पंढरीला जायला तर हा सोहळा निघाला पण त्याकाळी पंढरीचा मार्ग तर माहीती नव्हता.तेव्हा भानुदास महाराज बेलापुरकर यांचा घोडा"लाडक्या" पुढे चालायचा आणि सोहळा त्याच्या मागेमागे चालत.जिथे लाडक्या थांबत तिथे पालखी सोहळ्याचा मुक्काम होई.खरच संतांच्या संगतीचा परिणाम किती होतो ना?
श्रीमद् भागवतात ही म्हणलच आहे-
सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगा: खगा: |
गन्धर्वाप्सरसो नागा: सिध्दच्श्रारणगुह्यका ||
(स्कंद ११,अ.१२
श्लोक ३)
अजुन एक विशेषत्व इथे मला नमुद कराव वाटत ते असं की- सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर यांनी बेलापुर-पंढरपूर आषाढी वारी चालु केली होती.मग ती वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुर पर्यंत एकटे पालखी सोहळ्यात सोबत येत.तर,बेलापुर ला सोहळा आल्यावर मगच बेलापुरकर महाराजांची दिंडी बेलापुर पासुन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला मिळत.आजही ही परंपरा अव्यावहत पणे चालु आहे.आताचे बेलापुरकर महाराज परंपरेचे विद्यमान पिठाधीपती "ह.भ.प मोहन महाराज बेलापुरकर" हे ही परंपरा चालवतात.
पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी-
हा पालखी सोहळा सुरु झाला,तेव्हापासुन पुजाधिकारी गोसावी महाराज, डावरे महाराज हेही बेलापुरकर महाजांसोबत आहेत.
सोहळ्यात रथाच्या पुढे बेलापुर पासुन बेलापुरकर महाराजांची दिंडी असते.बेलापुर च्या आधी त्रंबकेश्वर ते बेलापुर सिन्नर गावठाण,कुंडेवाडकर आणि निवृत्तीनाथ महाराज संस्थानची दिंडी रथाच्या पुढे असते.
हा सोहळा इ.स.१८४० साली सुरु झाला.त्याप्रमाणे ह्या वर्षीचा *संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १७६ वा पालखी सोहळा ठरेल*.
बेलापुरकर महाराज परंपरा,पुजाधीकारी गोसावी महाराज,व डावरे महाराजांच्या सेवा काय आहेत. याचा अभ्यास केल्यावर संत तुकोंबांचे दोन प्रमाणं मला क्षणार्धात आठवले-
वंशपरंपरा दास मी
अंकित ||
आणि
ह्याचा धरिन अभिमान |
करिन आपुले जतन ||
उद्या संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास पाहुयात...
ह.भ.प आदरणीय मोहन महाराज बेलापुरकर.
(संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख)
ह.भ.प सागर महाराज बेलापुरकर.
यांनी ही माहीती दिल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार...
© श्रीगुरूदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in