Tuesday 21 June 2016

श्रीगुरू हैबतबाबा कोण होते ?

वारकरी संप्रदाय ! या अखंड हिंदुस्थानात वैचारिक दृष्टीने पसरलेला अनादी असणाऱ्या संताचा व वारकरी,फडकरी,
दिंडीकरी मंडळीचा साम्प्रदाय. अशा असणाऱ्या वारकरी साम्प्रदायाची संत ज्ञानोबा माऊली,एकनाथ महाराज,नामदेव महाराज,तुकाराम महाराज यांनी उभारणी केली.ही उभारणी इतकी मजबुत आहे जशी मजबुत इमारत.
बहिणाबाई यांच वर्णन करतात-
संत कृपा झाली | इमारत फळा आली ||१||
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिलें देवालया ||२||
नामा तयाचा किंकर | तेणे रचिलें तें आवार ||३||
जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत ||४||
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||५||
या प्रस्तुत अभंगाप्रमाणे ग्लानी आलेल्या,दुस्तर झालेला मार्ग वारकरी साम्प्रदायातील संतांनी प्रबोधन करुन स्वच्छ केला. ज्ञानोबांनंतरच्या सर्व वारकरी साम्प्रदायातील संत परंपरेची माहीती आपलेल्या या अभंगातुन कळते.
अशी दिव्य परंपरा असलेल्या या साम्प्रदायात पायी वारीला अतिशय महत्व नंतरच्या संतांनी दिले आहे.वारीची परंपरा तशी खुप जुनी म्हणजे माऊलींचे पंजोबा 'त्रंबकपंत' आपेगाव ते पंढरपूर वारी करायचे असा उल्लेख सापडतो.नंतर वारकरी साम्प्रदायातील थोर संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहुकर हे तुकोबारायांच्या सदेह वैकुंठागमनानंतर १६८५ साली म्हणजे तुकोबांच्या वैकुंठागमना नंतर ३६ वर्षांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन आळंदीत महाराज येत. आणि ज्ञानोबांच्या ही पादुका घेऊन ही वारी पुढे निघत.तेव्हापासुन
देहु -आळंदी-पंढरपुर अशी वारी सुरु झाली.नारायण महाराजांनीच ही वारी सुरु झाल्यावर वारीत "ज्ञानोबा-तुकाराम" हे भजन चालु केले.नंतर ही वारीच्या सोहळ्याची परंपरा १६८५ ते १८३० पर्यंत एकत्रित पणे चालु राहीली आणि पुढे मग देहुकर मोरे यांच्या सांगण्याहुन पुर्वी शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असणाऱ्या व नंतर विरक्त होऊन आळंदीस येऊन राहणाऱ्या थोर नामधारक,भगवद्भक्त हैबतबाबा यांनी वास्कर महाराज,शिरवळकर महाराज,व आजरेकर महाराज यांच्या समवेत इ.स १८३१ साली ज्ञानोबा माऊलींचा स्वतंत्र वारीचा पालखी सोहळा चालु केला.तेव्हापासुन माऊलींचा आणि तुकोबांचा सोहळा स्वतंत्र चालु झाला. आज आपण या सोहळ्याचं विशाल स्वरुप पाहतोच आहोत.ह.भ.प वै. तपोनिधी नारायण यांनी सुरु केलेल्या तुकोबा- माऊलींच्या संयुक्त सोहळयास,आणि आता चालु असणाऱ्या तुकोबांच्या सोहळ्यास या वर्षी ३३१ वर्षे पुर्ण होतील तर हैबतबाबांनी वास्कर महाराज,शिरवळकर महाराज,आजरेकर महाराज यांच्या समवेत सुरु केलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या वारीच्या सोहळ्यास या वर्षी १८६ वर्षे पुर्ण होतील.
ह.भ.प हैबतबाबा कोण होते? 
श्रीगुरु हैबतबाबा यांच मुळ गांव सातारा जिल्ह्यातील आरफळ.हैबतबाबा हे शिंदे सरकरांच्या दरबारी सरदार होते.त्यामुळे ते मुळ गावी न राहता ग्वाल्हेर ला असत.एकदा मुळ गावाची भेट व्हावी या उद्देशाने ते गावी जाण्यासाठी निघाले आणि रस्त्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेत त्यांच्या सोबतच वैभव पाहुन त्यांना चोर "भिल्ल" लोकांनी लुटले आणि बाबांना गुहेत कैद केले.आणि गुहेच्या तोंडावर मोठी शिळा ठेवली.
आता हैबतबाबा म्हणजे थोर भगवदभक्त ,ज्ञानोबांचे पट्टशिष्य! बाबांनी त्यांच्या ओजस्वी वाणीत माऊलींचा हरीपाठ म्हणण्यास सुरुवात केली.हा घोष अहोरात्र बाबा करत होते.योगायोग असा की, एकविसाव्या दिवशी त्या चोरांच्या नायकाची पत्नी प्रसुत झाली,तिला मुलगा झाला. त्या आनंदात त्याने त्या गुहेची शिळा बाजुला केली.तेव्हा आत सर्व जण अन्नपाण्याविना तडफडत होते.पण श्रीगुरु हैबतबाबा तेव्हाही हरीपाठ म्हणत होते.त्याने हा सर्व प्रकार पाहीला आणि प्रसन्न होऊन बाबांना त्यांच्या लुटलेल्या संपत्ती संपत्ती सहीत परत रवाना केले.
यानंतर श्रीगुरु हैबतबाबा आरफळ ला न जाता माऊलींमुळेच माझा पुनर्जन्म झाला असे मनात ठाम ठरवुन आळंदीलाच राहू लागले.आणि परत ते आरफळ ला कधीच गेले नाहीत.
या वारीच्या पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणुन श्रीगुरु हैबतबाबा यांनी शिंदे सरकार यांचे सरदार शितोळे सरकार यांच्याकडुन वारीस लागणारा लवाजमा आदी सामान घेतले. आजही हत्ती सोडले तर सर्व लवाजामा जसाच तसा अस्तित्वात आहे.त्याचबरोबर श्रीगुरु हैबतबाबा हे लष्करी सरदार असल्याने त्यांनी या वारीच्या सोहळ्यास लष्करी शिस्त लावली.ती ही आज आपणास पहावयास मिळते.
ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींचा जसा पालखी सोहळा आहे.त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज,संत सोपान काका,आदिशक्ती मुक्ताई,गोरोबा काका,संत गजानन महाराज यांचाही पालखी सोहळा त्या त्या ठिकाणाहून पंढरीस आषाढी वारीसाठी जात असतो.या सोहळ्यांच वैभव सुध्दा निराळ्या स्वरुपाच असतं.लाखो वारकरी मंडळी या सोहळ्यांत ही विठुरायाच्या भेटीची आंस उराशी बाळगुन चालत असतात.पण आज कुठल्याही वेबसाईट वर,पुस्तकांत जशी माऊलींच्या सोहळ्याच्या इतिहासाची माहीती सहजासहजी उपलब्ध आहे.तशी इतर संतांचा सोहळा कुणी चालु केला? त्याचे मानकरी कोण? ह्याची माहीती कुठेही उपलब्ध नाही.ही माहीती संकलित करुन आज जशी ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्याची लेखरुपात माहीती प्रकाशीत केली आहे.तशी अनुक्रमे प्रत्येक संतांच्या सोहळ्याची माहीती महाराष्ट्राला व जाणकार जनांना व्हावी या हेतुने रोज एका संतांच्या सोहळ्याचा इतिहास माझ्या लेखणीतुन मी लिहणार आहे.हे विशाल कार्य माऊलींच्या व सर्व संतांच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम कृपेनेच करण्याचे माझ्या मनात आले आहे.माऊली,तुकोबा,नामदेवराय,भानुदास महाराज,नाथ महाराज,निवृत्तीनाथ महाराज,सोपानकाका,आदिशक्ति मुक्ताबाई,सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये यासर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो की हे विशाल कार्य करण्याच सामर्थ्य या पामराला मिळावे.

शेवटी एव्हढेच म्हणेन-
माझ्या वडीलांची मिरासीगा देवा |
तुझी चरणसेवा साधावया ||
श्रीविठ्ठल.
@श्रीगुरुदास,संतचरणरज
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in