Tuesday 21 June 2016

शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा -
देखोनिया पंढरपूर | जीवा आनंद अपार||१||
टाळ मृदुंग वाजती |रामकृष्ण उच्चारिती ||२||
दिंड्यापताकांचा मेळ |नाचती हरुषे गोपाळ ||३||
चंद्रभागा उत्तम| स्थानस्नाने पतीतपावन ||४||
पुंडलिका लागता पायां | चुकें येरझार वांयां ||५||
पाहता विठ्ठलमूर्ती | भानुदासासी विश्रांती ||६||
(संत श्रेष्ठ भानुदास म.)
वरील अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा संत भानूदास महाराज(आमचे पुर्वज दादा महाराज चातुर्मास्ये यांचा अवतार भानुदास महाराजांच कीर्तन पुरश्चरण पुर्ण करण्याकरिता झाला.)यांचा आहे. या सारख्या अनेक अभंगात भानुदास महाराजांनी पंढरीच महात्म्य वर्णन केले आहे. त्यावरुन आपल्याला असं म्हणता येईल कि, ‌ज्ञानोबा माऊली यांच्या घराण्याप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या घराण्यात सुद्धा पंढरीस जाण्याची,वारी करण्याची परंपरा होती.ही परंपरा पुढेही अव्याहत पणे चालु राहीली. नाथ महाराजांच्या सुद्धा अनेक अभंगात पंढरीचं वर्णन आलय.त्यामुळे पंढरीची वारी ही नाथ महाराजांच्या काळात ही त्यांच्या घराण्यात होती.
शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी त्यांच ६६ वर्षांच अवतार कार्य संपवल. आणि इसवी सनाप्रमाणे १५९९ साली पैठण नगरीत गोदावरीतीरी समाधी घेतली.नाथ महाराजांनी समाधी फाल्गुन महिन्यात घेतली आणि जेष्ठ महिन्यात त्याच वर्षी काही तज्ञ अभ्यासकांच्या मताप्रमाणे नाथमहाराजांचे चिरंचीव "हरीपंडीत महाराज" यांनी नाथ महाराजांच्या पादुका मस्तकावर ठेऊन पंढरीस जाण्यास सुरुवात केली.(नाथांचा पालखी सोहळा हा मानाचा तिसर्या क्रमांकाचा पालखी सोहळा आहे.) तर काही जाणकार तज्ञांप्रमाणे हरिपंडीत महाराज यांचे चिरंजीव नाथ महाराजांचे नातु "राघोबा महाराज" यांनी पादुका घेऊन पंढरीस जण्यास सुरुवात केली.भरपुर अभ्यास करुनही दोन्ही मते बरोबर आहेत.असंच सार समोर आल म्हणुन आपण याचा विचार जास्त न करता हरिपंडीत महाराज/राघोबा महाराज यांनी पादुका डोक्यावर घेऊन पंढरीस आषाढीस वारीला जाण्याची सुरुवात केली असे म्हणुयात.ज्यावेळेला पादुका घेऊन महाराज जात तेव्हा हा सोहळा अगदी छोटा होता. तरीही भरपुर वारकरी पादुकेसोबत असत.कालांतराने पुढील पिढीतील नाथवंशज "जानकीबाई" यांनी या वारीला पालखी सोहळ्याच स्वरुप दिलं.जानकीबाईं पासुनच नाथांचा पालखी सोहळा विशाल झाला अनेक दिंड्या या पालखी सोहळ्यास जोडल्या गेल्या.
जानकीबाईंनी तर या वारीला सोहळ्याच रुप दिलच.यानंतरही नाथांचे अकरावे वंशज श्री ह.भ.प.वै नारायण महाराज गोसावी यांनी तर हा सोहळा खुपच मोठा केला.नारायण महाराजांच्याच काळातच नाथ महाराजांचा सोहळा महाराष्ट्राला परिचीत झाला.एक सत्तर ते एेंशी वर्षापुर्वी वारकरी साम्प्रदायाचे थोर विभुती वै मामासाहेब दांडेकर यांच्या "वारकरी साम्प्रदायाचा इतिहास" या पुस्तकात मामासाहेबांनी सात संतांच्या पालखी सोहळयाचा उल्लेख केला आहे. त्यात संत ज्ञानोबा माऊली,तुकाराम महाराज व नाथ महाराज यांच्या सोहळ्या संबधीचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो तो असा-
"ज्ञानोबांच्या सोहळ्यात ५-६ हजार वारकरी असत. तर तुकोबांच्या सोहळ्यात ७००-८०० वारकरी असत" पुढे माासाहेब नाथांच्या सोहळयासंबधी लिहतात-
"नाथांचा पालखी सोहळा तर खुपच वैभवशाली आणि मोठ्या दिमाखात पार पडतो.या सोहळ्यात सुमारे ५-६ हजार वारकरी सामील होत.सोहळयात हत्ती,घोडे,शिंगवाले,तसेच विविध मानकरी मोठ्या दिमाखात निष्ठेने चालत.
हे इथे नमुद करायचा उद्देश असा कि सुमारे ७० वर्षापुर्वी लिहल्या गेलेल्या पुस्तकात मामासाहेबांनी नाथांच्या सोहळ्याच्या पुर्वीच्या वैभवाच वर्णन खुप यथार्थ रित्या केल आहे.म्हणजे पुर्वी ज्ञानोबांप्रमाणेच शांतीब्रह्म नाथ महाराजांचा पालखी सोहळा ही विशाल व बहुपरिचीत होता.
अजुन एक विशेषत्व मला नाथांच्या सोहळ्याबद्दल सांगायला आवडेल ते अस कि,सर्व संतांच्या वारीच्या काल्याच कीर्तन आपल्याला माहीती असल्याप्रमाणे गोपाळपुरास होते.मात्र नाथ महाराज परंपरेच्या काल्याचं भजन पुर्वापार चालत असलेल्या परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या देवळातील लाकडी सभामंडपात होते.
पालखी सोहळ्याचे मानकरी-
रथाच्या पुढे पहिली दिंडी पालखी सोहळ्याचे मालक
"नाथवंशज गोसावी महाराज" यांची असते. तर नंतर वऱ्हाड प्रांतातील तिन दिंड्यांचा मान असतो.या तिन दिंड्या सोहळा सुरु झाला तेव्हा पासुन आपली सेवा अव्याहत पणे देत आहेत.तसेच तिन पिढ्यांपासुन नाथांचा रथ ओढण्याचा मान 'डॅा.मंत्री' यांच्या बैलजोडीस आहे..
अशाप्रमाणे नाथांच्या अतिप्राचिन असणाऱ्या सोहळयाच स्वरुप असतं.
नाथ महाराजांच्या पालखी सोहळा नाथांनी समाधी घेतली त्याच वर्षी सुरु झाला त्याप्रमाणे यंदाच पालखी सोहळ्याचं हे ४१७ वर्ष आहे.कालच आपण पाहील की तुकोबांच्या पालखी सोहळ्यास ३३१ तर माऊलींच्या सोहळ्यास १८६ वर्षे पुर्ण होतील.म्हणजे नाथ महाराज यांचा पालखी सोहळा हा संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबां माऊलीं पेक्षाही प्राचिन आहे..
खरचं या पालखी सोहळ्यात सर्वांनी जरुर जरुर एकदा तरी जा..ज्ञानोबा-तुकाराम प्रमाणे भानुदास- एकनाथ जयजयकार करा..आपल जीवन सार्थक होईल.
एकनाथ महाराजांनी म्हणलचं आहे-
"अनुपम्य जाती पंढरीये |
अनुपम्य वस्ती होय
पंढरीये ||"

चला तर मग निघुयात...

©श्रीगुरूदास संतचरणरज
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in/