Tuesday 21 June 2016

संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

||ज्ञानेशो भगवान विष्णु ||

संतश्रेष्ठ सोपानकाका हे संत ज्ञानेश्वर माऊली,निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांचे बंधू .सोपानकाका आळंदी जवळच असणाऱ्या "सासवड" गावी समाधीस्थ झाले.
ह.भ.प वै धोंडोपंत दादा महाराज अत्रे १५० वर्षापुर्वी पंढरीत वास्तव्यास असणारे थोर भवगदभक्त होते.धोंडोपंत दादा महाराज हे "सदगुरु ह.भ.प वै. गंगुकाका महाराज शिरवळकर महाराज" फडपरंररेचे शिष्य होते.महाराजांची 'वारी' वर अफाट निष्ठा होती. संत तुकोबारायांचा गाथा,ज्ञानेश्वरी इ.ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. आणि अशा थोर भगवदभक्त निष्ठांवत वारकरी असणाऱ्या "वै.ह.भ.प धोंडपंत दादा महाराज अत्रे" यांनी संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा अंदाजे साधारण १२५ वर्षापुर्वी संत सोपानकाकांचे त्यावेळचे पुजाधिकारी ह.भ.प वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांच्या सहकार्याने चालु केला.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा जेव्हा सुरु झाला तेव्हा २०० वारकरी या सोहळ्यासोबत असत.सुरुवातीचे काही दिवस खांद्यावर पालखी घेऊन सोहळा चालत असे.पण कालांतराने रथ बनवला गेला.या सोहळ्यात पहिल्यापासुन धोंडोपंत दादा महाराज अत्रे,खरवडकर महाराज,देशमुख महाराज यांच्या दिंड्या आहेत.
वै.ह.भ.प धोंडोपंत दादा महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचेच शिष्य असणाऱ्या वै.ह.भ.प भगवान महाराज शिवणीकर यांनी हा सोहळा चालवला.तर आता भगवान महाराजांचे वंशज आमचे आदरणीय ह.भ.प माधव महाराज शिवणीकर हे ह्या सोहळ्यास चालवण्यास मोलाचे सहकार्य करतात. तर सध्या वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे नातु ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत.
हा पालखी सोहळा सासवड-मोरगांव-अकलुज-वाखरी या मार्गे पंढरीत दाखल होतो.
आताच्या काळात जवळपास १ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
यंदांचा संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा अंदाजे १२५ वा असेल असे वाटते.
[खुप पुस्तके चाळुन,जेष्ठांच मार्गदर्शन घेऊन ही संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास एवढाच ज्ञात झाला. तेवढा आपल्यासमोर मांडला आहे.]

©श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

-varkariyuva.blogspot.in