Wednesday 16 March 2016

आळस - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


मनुष्य हा इंद्रियांचा स्वामी असूनही दास बनतो आणि त्यामुऴे परमात्म्याला विसरतो. कृतघ्न बनतो, या दोन चुका माणसाकडून घडतात. आणि तिसरी चूक त्याच्याकडून घडते ती विषयातून बाहेर पडण्याचे आणि इंद्रियांचा स्वामी बनण्याचे सामर्थ्य त्याच्यात असूनही तो करत नाही.
या चुकीमागे सामर्थ्याची जाणीव नसणे,जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा आऴस करणे अशी कारणे सांगता येतील.
माणसाच्या ठिकाणी अनेक गोष्टी करण्याचे सामर्थ्य आहे.ते सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही क्षेत्रांत आहे. ताजमहालासारखी कलाकृती किंवा काँम्प्युटरचा शोध माणसानेच लावला.पारमार्थिक क्षेत्रात परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य माणसाचेच आहे.पण ब-याच वेऴा आपले सामर्थ्य त्याला कऴत नाही. इसापनीतीमध्ये एक कथा आहे , एका कोल्हिणीला सिंहाचा छावा सापडला.तिने त्याला घरी आणले.आपल्या पिलांबरोबर वाढवले.त्या पिलांबरोबर वाढविल्याने तो छावा मोठा होऊनही स्वत:ला कोल्हाच समजू लागला.एकदा एका सिंहाने त्यास जाणीव करून दिली की तू कोल्हा नाहीस, सिंह आहेस. माणसालाही त्याच्या सामर्थ्याची जाणीव होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते.काही वेऴा आऴसाने मनुष्य सामर्थ्य असूनही निष्क्रिय होतो. आऴसाने काहीही प्राप्त होत नाही. भर्तृहरीने म्हटले आहे,
' आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थॊ महारिपु: ।'
आऴस हा माणसाचा सर्वात मॊठा शत्रू आहे.माणसाचे सामर्थ्य आऴसाने नष्ट होते.ज्याला मोठे व्हायचे असेल त्याने सहा दोषांचा त्याग करावा असे महाभारत सांगते. ते म्हणजे फार झोप, सुस्ती,भय,क्रोध,आऴस आणि दीर्घसुत्रीपणा.
षडदॊषा: पुरूषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्री भयं क्रॊध आलस्यं दीर्घसूत्रता ।।
जर आपले सामर्थ्य आपण जाणत नसू तर ती आपली चूक नव्हे काय ?
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.