Wednesday 16 March 2016

स्वार्थ - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


आपण ठरविलेले उद्दिष्ट प्राप्त व्हावे म्हणून प्रत्येक जण धडपडतो आहे.वाटेल ते करावे; पण आपले साधून घ्यावे , ही प्रवृत्ती वाढते आहे.सरऴ मार्गाने काम होणार नसेल तर कोणताही मार्ग आचरण्याची तयारी असते.असे वागण्यामध्ये केवऴ स्वार्थाचा विचार असतो.माणसाने एखादे कार्य करताना इतरांचाही विचार केला पाहिजे. भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये याच विचाराला अनुसरून मानवी वृत्तीचे चार प्रकार केले आहेत.
एते सत्पुरूषा :परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये ।
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृत : स्वार्थाऽविरोधेन ये ।।
तेऽमी मानवराक्षसा : परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये ।
ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ।।
इतरांचे भले व्हावे म्हणून जे स्वत : चाही विचार न करता धडपडतात, ते मानवी देह धारण करणारे सत्पुरूष , संत आहेत. ते जगाच्या कल्याणासाठीच अवतरलेले असतात. दुसरा वर्ग माणसातील सामान्य माणसाचा आहे. आपला स्वार्थ साधल्यानंतर ते इतरांचा विचार करतात.इतरांचे चांगले व्हावे , अशी इच्छा ते व्यक्त करतात; पण स्वत:चे चांगले साधल्यानंतर ! सध्याच्या काऴात बहुतांश लोक या वर्गात मोडणारे आहेत. ' शिवाजी महाराज जन्माला यावेत ; पण इतरांच्या घरात ! ' अशी ही वृत्ती आहे.
तिसरा वर्ग हा मानवातील राक्षसांचा आहे.म्हणजे हे मानव म्हणून जन्माला येतात; पण वृत्ती मात्र राक्षसाची असते. हे लोक स्वार्थासाठी इतरांच्या हिताचाही नाश करतात.इतरांचे काय वाटेल ते होवो; पण मला हवे ते प्राप्त झालेच पाहिजे, असा यांचा स्वभाव आहे. हे लोक स्वार्थाने अंध झालेले असतात.असेही लोक जगात कमी आहेत असे समजण्याचे कारण नाही; पण भर्तृहरींनी याच्याही पुढचा एक वर्ग सांगीतला आहे; पण त्या वर्गाला काय म्हणावे हेच कऴत नाही.या वर्गात विनाकारणच इतरांचे अकल्याण करणारे लोक असतात. स्वार्थ नसताना , आपला संबंध नसताना विनाकारणच लोकांच्या कल्याणाच्या आड उभा राहण्याचा यांचा स्वभाव असतो. यांना दुस-यांचे चांगले बघवतच नाही.या वर्गाला माणसातले कोण म्हणावे ? हे मानवी जन्माला येणे म्हणजे या जन्माचा अपमान होय ! यांना काय म्हणावे ? हे माणसांतले नाही , राक्षसांतीलही राक्षस असतात.
*****
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.