Thursday 10 September 2015

चित्रकुटावरील बंधूंची भेट म्हणजे त्रिवेणी संगम - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||


राजा दशरथाचा अंत्यविधी करुन, भरत अयोध्यावासीयांबरोबर चित्रकुट पर्वतावर रामाला भेटण्यासाठी गेल्यानंतर शत्रुघ्न ही वार्ता प्रभू रामाला सांगतात, त्या ठिकाणी दशक्रिया विधी झाल्यानंतर रामाला परत अयोध्येकडे येण्याची विनंती भरत करतो, मात्र राम ती मान्य करीत नाहीत. या ठिकाणी राम-भरत व शत्रुघ्न हे तीन बंधू एकमेकांना मिठी मारतात. ही त्यांची भेट म्हणजे त्रिवेणी संगमच, सर्वांना अनुभवायला मिळतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, या ठिकाणी झालेला त्रिवेणी संगम म्हणजे काय हे सांगताना महाराज म्हणतात, राम म्हणजे गंगा, भरत म्हणजे यमुना तर शत्रुघ्न म्हणजे सरस्वती होय. रामाला विनंती करुनदेखील ते परत येत नाहीत म्हटल्यावर भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला परत आले. यानंतर सुदसुव नावाचा गंधर्व कावळ्याच्या रुपात येऊन सीतेच्या अंगावर बसतो. यावर राम त्याच्यावर ब्रह्मस्त्र सोडतात. त्यावेळी तो सुदसुव आपले मरण येणार म्हणून शरण येतो, त्यावर त्या कावळ्याच्या एका डोळ्यावर आघात होतो. तेव्हापासून कावळ्याला एक बुबुळ व दोन डोळे आहेत. व तेव्हापासूनच कावळ्याला पिंड ग्रहण करण्याचा अधिकार दिला आहे.
राम पुढील प्रवासाला लागतात वाटेत विराझ राक्षस भेटतो, त्याचा वध केल्यानंतर पुढे शरधंग ऋषींची तसेच अत्रिक व अनुसयेची भेट होते. पुढे अगस्ती ऋषींची भेट झाल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन ते पंचवटीला राहतात. त्या ठिकाणी शुर्पनखा राम-लक्ष्मणासमोर येते व मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे अशी मागणी करते. तिचे कपट पाहून राम तिचे नाक कापतो. ती रावणाकडे जाऊन रामाविषयी माहिती देते. याचे रावणाला काही वाटत नाही म्हटल्यावर ती रावणाला सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करते हे ऐकून रावणाच्या मनात सीतेविषयी आसक्ती निर्माण होते व त्यानंतर रावण सीतेला पळवून नेण्यासाठी पंचवटीला येतो. या प्रवचनासाठी अँड. पुरुषोत्तम चव्हाण, कैवल्य उत्पात, कवी रामचंद्र इकारे उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२