Thursday 10 September 2015

आत्मा अमर असतो - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
प्रभू राम शबरीच्या आश्रमातून पुढे जात असताना राम-लक्ष्मण व हनुमान या तिघांची भेट होते. ही भेट म्हणजे रामायणातील दुसरा त्रिवेणी संगमच होय. राम व सुग्रीवाची हनुमान भेट घडवून आणतात. रामाची भेट झाल्यामुळे सुग्रीवाच्या मनात असलेले वालीचे भय निघून जाते. ज्याप्रमाणे रामाची पत्नी रावणाने पळवून नेली आहे, त्याप्रमाणेच सुग्रीवाची पत्नी रुमा हिचेदेखील अपहरण केलेले असते. त्यामुळे या समदु:खी सुग्रीव व रामात चांगली मैत्री निर्माण होते, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज पुढे म्हणाले की, सुग्रीवाची भेट झाल्यानंतर हनुमानाला सापडलेले सीतेचे दागिने तो राम व लक्ष्मणाला दाखवितो व हे दागिने तुम्ही ओळखता का, असे विचारतो. त्यावर लक्ष्मण म्हणतो की, मला कानातली कुंडले माहीत नाहीत की, गळ्यातला हारही माहीत नाही. मी फक्त पायातील जोडवी ओळखतो. कारण मी रोज सकाळी सीतामातेचे दर्शन घेत होतो, त्यामुळे मला जोडवी माहीत आहेत. यावरुन लक्ष्मणाची आचारशीलता लक्षात येते. पुढे सुग्रीव व वालीमध्ये युद्ध होते. रामाच्या एका बाणाने वालीचा मृत्यू होतो. त्यावेळेस वाली रामाला म्हणतो की, माझं अन् तुझं वैर नसताना तू मला का मारले? त्यावेळेस राम म्हणतात की, तू सुग्रीवाच्या बायकोला पळवून नेऊन अधर्म केला आहे. आणि सुग्रीव मला शरण आलेला आहे. शरण आलेल्या भक्ताचा भाऊ पुढे अध:पतनाला जाऊ लागला होता आणि तो जाऊ नये म्हणून मी माझ्या बाणाने तुझा उद्धार केला आहे. शेवटी वाली प्राण सोडतो. पुढे वालीची बायको तारा रडते व रामाला वाईट बोलू लागते. राम म्हणतात की, तू पती वालीच्या देहाला मानते की आत्म्याला, जर देहाला पती मानत असशील तर हा देह तुझ्यासमोर आहे, अन् आत्म्याला मानत असशील तर कोणाचाच आत्मा कधीच मरत नसतो. त्यामुळे तू शोक करु नको. व शेवटी राग शांत होतो. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२