Thursday 10 September 2015

शंभर योजने समुद्र पार करून हनुमान लंकेत- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
 वालीच्या मृत्यूनंतर प्रभू रामाच्या साक्षीने सुग्रीवाला किष्किंदा नगरीचा राजा करण्यात आले. त्यानंतर सुग्रीवाने चारी दिशांना सीतामातेच्या शोधात आपली वानरसेना पाठवली, तर खास दक्षिणेकडे हनुमान निघाले. त्यावेळेस हनुमंत रामाला विचारतो की, मी सीतेला कसे ओळखणार? त्यावर राम म्हणतात की, जिथे सीता असेल त्याच्या चोहोबाजूला रामनामाचे स्मरण असेल. हनुमान पुन्हा म्हणतो की, सीता मला कशी ओळखेल? त्यावर राम आपल्या हातातील अंगठी देतात व ती अंगठी कोठे पडू नये यासाठी ती अंगठी आपल्या तोंडात घेऊन हनुमान अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत लंकेत प्रवेश करतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, हनुमान निघाला असताना वाटेत डोंगरावर एक गुहा दिसते, त्या गुहेत फळे आणि पाणी भरपूर असते. त्याठिकाणी तापसी नावाची स्त्री असते. तिच्यात आणि हनुमंतामध्ये संवाद होतो, ती सर्वांना डोळे झाकायला सांगते व नंतर उघडताच सर्व वानरसेना समुद्राच्या काठावर थांबलेले दिसतात. तिथे जटायूचा भाऊ संपाती याची भेट होते. त्याला सूक्ष्मदृष्टी असते. तो एका डोंगरावर उभा राहून पाहतो तेव्हा त्याला लंका दिसते व त्या लंकेत अशोक वनातील एका वृक्षाखाली सीता त्याच्या दृष्टीस पडते. मात्र लंकेत जाण्यासाठी शंभर योजनेचा समुद्र असतो. हे अंतर रोज पार करणाराच समुद्रात जाऊ शकतो. प्रत्येक जण प्रयत्न करतात; मात्र १0 ते ५0 योजनेच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. मग जांबुवंत हनुमंताला त्याच्या शक्तीचे स्मरण करून देतात. हनुमंत प्रभू रामाचे स्मरण करून उड्डाण घेतात. जाताना समुद्रात मैनात नावाचा पर्वत त्याला आडवा येतो. तो विश्रांतीला थांबण्याची विनंती करतो; मात्र थांबणे हे माझे काम नाही, असे हनुमान म्हणतो.
शेवटी त्याच्या आग्रहाखातर तो आपल्या पायाचा स्पर्श त्या पर्वताला करतो. पुढे सुरसा व सिंहीका देखील त्याला आडव्या येतात; मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर तो शंभर योजने समुद्र पार करून लंकेत प्रवेश करतो, असे महाराज म्हणाले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२