Thursday 10 September 2015

छायारुपी सीतेचे रावणाने केले अपहरण- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
 राम, लक्ष्मण व सीता पंचवटीमध्ये राहत असताना, इकडे रावण व मारिच यांचा संवाद सुरु होतो. व तो सीता अपहरणासाठी तयार केलेली युक्ती सांगतो व मारिचाला तू हरणाचे रुप घेऊन पंचवटीला जाण्यास सांगतो, मात्र मारिच तयार होत नाही म्हटल्यावर तो, तुला मारुन टाकीन असे म्हणतो, मग शेवटी इथे रावणाच्या हातून मरण्यापेक्षा पंचवटीला जाऊन रामाच्या हस्ते मेलेले बरे म्हणून मारिच हरणाचे रुप घेऊन पंचवटीला येतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. मारिच सोनेरी हरणाचे रुप घेऊन पंचवटीला आल्यानंतर सीता ते हरीण पाहते व त्या हरणाविषयी प्रभू रामाकडे इच्छा व्यक्त करते. हा संवाद ऐकत असलेला, सर्वत्र लक्ष ठेवून असलेला लक्ष्मणलादेखील या हरणाविषयी संशय येतो. मात्र रामाला अपूर्व काम करावयाचे असल्यामुळे प्रभू राम धनुष्य घेऊन त्या हरणाच्या पाठीमागे लागतात. रामाने मारिच हरणावर बाण सोडला व नंतर लक्ष्मण हाका मारायला लागला. ही हाक सीतेने ऐकली तेव्हा तिने लक्ष्मणाला बोलावून घेऊन रामाकडे जाण्यास सांगितले मात्र लक्ष्मण काही तयार झाला नाही. तेव्हा सीता वाईट विचार व वाईट उच्चार करु लागली. यावर महाराज म्हणतात की, वाईट विचार, वाईट उच्चाराला जन्म देतात. म्हणून विचार शुद्ध असतील तर उच्चार शुद्ध होतात अन् उच्चार शुद्ध असतील तर आचारदेखील शुद्ध राहतात. मग शेवटी लक्ष्मण रेघा ओढून रामाकडे गेला. त्यादरम्यान रावण भिक्षुकाचे रुप घेऊन पंचवटीत हजर होतो. सीता ज्यावेळी भिक्षा आणण्यासाठी झोपडीत जाते तेव्हा सगळे देव झोपडीत अवतरतात, ते सीतेला बाहेर जाऊ नको म्हणतात कारण रावणाने सीतेला हात लावला तर तो भस्मसात होईल अन् मग रावण मेला तर प्रभू राम लंकेत जाणार नाहीत, मग इंद्रजितच्या तावडीतून आपली सुटका कोण करणार? शेवटी सीतेने एक योजना आखली व आपल्या शरीरातून आपली छाया बाजूला काढली व ती स्वत: अग्निस्वरुप झाली. या छायेला स्पर्श केला तरी रावणाला काही होणार नाही. शेवटी रावण छायारुपी सीतेचे अपहरण करतो. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२