Thursday 10 September 2015

अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू || 
रामायणाचा विचार केला असता राम, लक्ष्मण व भरत या पात्रांचा सातत्याने उल्लेख होतो. मात्र पडद्याआड असलेला व अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा असा शत्रुघ्न रामाचा दास, आज्ञाधारक तसेच कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा वा कोणतीही अपेक्षा नसणारा असा तो शत्रुघ्न होता, असे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले, रामायणामध्ये चार बंधूंपैकी शत्रुघ्नचा फारसा विचार झाला नाही. ज्यावेळी राम- लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात होते त्यावेळेस भरत हादेखील चौदा वर्षे अयोध्येशेजारील नंदीग्राममध्ये होता. अशा प्रसंगामध्ये १४ वर्षे अयोध्येचे राज्य ज्यांनी सांभाळले असा तो शत्रुघ्न होता. वनवासाला गेलेल्या राम-लक्ष्मणाला राज्यगादीची अपेक्षा नव्हती. त्याचप्रमाणे नंदीग्राममध्ये राहणार्‍या भरताला देखील नव्हती. परंतु राज्यगादी समोर दिसत असताना त्याची अपेक्षा नसलेला शत्रुघ्न होता, असे महाराजांनी स्पष्ट केले. या शत्रुघ्नचे विविध पैलू उघडून दाखवताना महाराज म्हणतात की, शत्रुघ्नने जो अहंकार जिंकला होता तसेच स्वत:चे मी पण त्याने कधीही रामायणात मिरवले नाही. म्हणून शत्रुघ्नचा विचार हा रामाच्या दासाचा दास म्हणजे राम-भरत-शत्रुघ्न असा होतो. नावातच शत्रुघ्न असलेला तो आज्ञाधारक होता. रामायणामध्ये या शत्रुघ्नने लवनासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. तो नाश करताना प्रभू रामाला ब्रह्मदेवाने दिलेला एक बाण रामाने शत्रुघ्नला दिला होता. असा हा शत्रुघ्न रामायणात जास्त कोठे दिसत नाही. परंतु त्याचा सर्व कार्यात सहभाग होता. ज्या वेळेस शत्रुघ्न आणि भरत अयोध्येत आले होते तेव्हा त्यांना राम-लक्ष्मण वनवासाला गेल्याची बातमी कळाली आणि भरत कैकयीला नावे ठेवू लागला. परंतु शत्रुघ्न हा कैकयीच्या मनात हा विकार कोणी निर्माण केला, त्याचा शोध घेऊन दासी मंथराला शिक्षा देण्यास तयार झाला म्हणजेच त्याचा स्वभाव कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा असा तो शत्रुघ्न होता. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२