Thursday 10 September 2015

सुख-दु:खाच्या कल्पना मनातच तयार होतात- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
 राम-लक्ष्मण-सीता अयोध्या सोडून वनवासाला निघाले तेव्हा नावाड्या लक्ष्मणला म्हणतो की, कैकयीने किती दु:ख दिले. यावर लक्ष्मण म्हणतो की, सुख-दु:ख देणारा दुसरा कोणी नसतो, तर आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपले मन तयार होत असते व मनातच सुख-दु:खाच्या कल्पना तयार होतात. सुख-दु:ख हे वास्तवता नसून, त्या मनाच्याच कल्पना असल्याचे लक्ष्मण म्हणतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. राम वनवासाला निघाल्यानंतर गंगा नदीच्या तीरावर असलेला नावाडी गुहकाची भेट होत.े. त्याठिकाणी मुक्कामी गुहक व लक्ष्मणाचा हा संवाद या ठिकाणी महाराज सांगतात. तसेच सकाळी गंगा नदी पार करण्यासाठी गुहक नावाडी रामाला पलीकडे नेण्यास तयार होत नाही. राम जेव्हा याचे कारण विचारतात तेव्हा गुहक म्हणतो, तुमच्या पायाची धूळ लागली तर एका दगडातून अहिल्येचा उद्धार होतो तसे तुमचे पाय लागल्यानंतर माझ्या नावेचा उद्धार झाल्यानंतर मी माझे पुढील जीवन कसे जगू? तुम्हाला जायचेच असेल तर सर्वप्रथम मला तुमच्या पायाची पूजा करु द्या. हा नावाडी पूर्वजन्मी कासव होता, त्यामुळे त्याला भगवंताचे दर्शन घेता आले नाही. यंदा मात्र नावाड्याने पायाची पूजा केल्यानंतर राम पैलतीरावर जातात. व इकडे सुमंत प्रधान अयोध्येकडे परततो. त्यावेळी अयोध्येमध्ये आक्रांत सुरु असतो. राजा दशरथदेखील राम राम म्हणत आपला देह सोडतो. अयोध्येतील लोकदेखील म्हणतात, तू रामाबरोबर गेला होता मग एकटाच का परत आला. असे म्हणून त्याला शिव्याशाप देऊ लागतात. शेवटी वसिष्ट ऋषी भरताला बोलावून घेतात व घडलेली सर्व हकिकत सांगतात व भरत राजा रामाला भेटण्यासाठी चित्रकुट पर्वताकडे निघतात, असे महाराज म्हणाले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२