Thursday 10 September 2015

रावण छळवादी तर जटायू सात्विक - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
रावण सीतेचे अपहरण करून पुढे जात असताना वाटेत त्याला जटायू भेटतो, रावण हा छळवादी व क्रोधी वृत्तीचा होता तर जटायू हा सात्विक व सत्यवादी होता. या दोघात झालेल्या युद्धादरम्यान दोघे एकमेकांचा मृत्यू कशात आहे, असे विचारतात तेव्हा रावण खोटे बोलून माझा मृत्यू माझ्या डाव्या पायाच्या अंगठय़ात असल्याचे सांगतो तर सत्यवादी जटायू माझा मृत्यू माझ्या पंखात असल्याचे सांगतो. त्यानंतर जटायू रावणाच्या डाव्या पायाचा अंगठा फोडतो त्यादरम्यान रावण त्याचे दोन्ही पंख छाटून सीतेला घेऊन जातो. जखमी जटायूने रावणाला सीतेचे ओझे झेपणारही नाही अन् पेलणारही नाही असे म्हटल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, या युद्धात जखमी झालेला जटायू म्हणतो अरे रावणा माणसाने आपल्याला झेपेल तेवढेच ओझे उचलावे, जेवढे पचेल तेवढेच अन्न खावे. तुला सीता उचलल्यामुळे हलकी वाटत असली तरी तुला ते ओझे झेपणारही नाही, पेलणारही नाही. मात्र रावण हे न ऐकता पुढे जातो. इकडून सीतेला शोधत असलेले राम-लक्ष्मण येतात. राम दंडकारण्यात सीता विरहाने व्याकूळ होऊन झाडांना, दगडांना, फुले-फळांना स्पर्श करून विचारतात की माझी सीता कुठे आहे. या झाडांना व दगडांना स्पर्श करताना त्यांचा उद्धार करणे हा त्यांचा हेतू होता. त्यानंतर विरहावस्थेतील जटायूजवळ आल्यानंतर जटायू सर्व वृत्तांत रामांना सांगतो. जटायूची अवस्था पाहून राम त्याला पंख येण्यासाठी स्पर्श करतो, असे म्हणतात. मात्र जटायू तयार होत नाही. तो म्हणतो आता माझ्या मुखात रामनाम आहे, माझ्या डोळ्यात रामदर्शन आहे आणि हृदयात स्थान आहे. अशा स्थितीत मला जीवदान देण्यापेक्षा मरणच बरे. शेवटी राम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा उद्धार करतात.
त्यावर राम म्हणतात, सीतेच्या अपहरणापेक्षा जटायू मेल्याचे मला जास्त दु:ख झाले आहे. पुढे शबरीच्या आश्रमात येऊन तिच्या मनातल्या भावापोटी तिची उष्टी बोरे खातात व ऋषीमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घेण्यासाठी जातात. जटायूपक्षाने सीता अपहरणानंतर रावणाला समजावून सांगत असे वागू नको, अशी विनवणी केली. मात्र त्यांनी जटायूचे काहीच ऐकले नाही. त्यामुळे त्याला संकटात जावे लागले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२