Tuesday 28 March 2017

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज



स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमना नंतर त्यांचे शिष्य ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कारभार १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने पाहिला. त्यांचाच दोन तपाच्या (२४ वर्षच्या) काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेने विकत घेतलेल्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून आर्थिक वर्गणी, दान मिळतील तेथे शेतजमिनी व घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. याचबरोबर महाराष्ट्रभर पायपीट करुन वारकरी परंपरेचे भजन कीर्तन, नामसप्ताह सुरु केले. सर्वसामान्य कुटुंबातील खेड्यापाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवादक बनविले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दुरावस्था झालेल्या मठ मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि त्यांचे व्यावस्थापन व्यवस्थित चालावे म्हणून आपल्या योग्य शिष्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली व महाराष्ट्राच्या परमार्थिक विश्वामध्ये नवचैतन्य निर्माण केले.
ज्या कुटुंबात, गावात किंवा समाजात वारकरी संस्कार नव्हते अशा ठिकाणी अतिशय कष्ट व सायासाने त्यांनी वारकरी सांप्रदाय रुझविला. वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती,भजन गायन पद्धती पुनर्स्थापित करण्याचे श्रेय ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनाच आहे. त्यांनी आपली मोठी शिष्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली.आज त्या शिष्य परंपरेने संपूर्ण मराठी विश्व संप्रदायाच्या संस्काराने पुनीत केले आहे. अशा ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

- साभार - वारकरी शिक्षण संस्था