Tuesday 28 March 2017

वारकरी शिक्षण संस्था म्हणजे समाजाकडून संचालित, सक्रीय अनौपचारिक संत साहित्य विद्यापीठ.

संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारुतीबुवा गुरव ह.भ.प.वै. मारुतीबुवा ठोंबरे यांच्या प्रयत्नाने झाली, परंतु संस्थेच्या स्थापने नंतर अल्पावधीत म्हणजेच दोन वर्षे अकरा महिन्यातच सद्गुरू जोग महारांचा इहलोकवास समाप्त झाला.परंतु या अल्प काळातच सद्गुरू जोग महाराजांनी संस्थेच्या कायदेशीर आर्थिक व संघटनात्मक बाबांची प्राथमिक पूर्तता करून संस्था स्थिर केली होती. त्यानंतर या कार्याचा विस्तार ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी २४ वर्ष ३ महिन्यांच्या आपल्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात केला. महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरु केले. भजनासाठी लागणाऱ्या मृदुंगाला बोल दिले, वीणेला स्वर दिला व टाळाला ताल दिला आणि “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन सार्थ केले. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबध्द, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा सुरु केली.महाराष्ट्रातील जीर्णशीर्ण अशा मठ, मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देवून वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वसंग परित्यागी संन्यास जीवनाचा विचार न करता संप्रदाय हितार्थ व लोकसंग्रहार्थ खूप परिश्रम घेतले. या कार्यात प.पु. स्वामींनी ह.भ.प.वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर महाराज , ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर , ह.भ.प.वै मारुतीबुवा गुरव या गुरुबंधूंचे मोठे सहकार्य लाभले.
संस्थेत कोणताही भेदभाव बाळगला जात नाही. “अठरा वर्ण याती | भेद नाही तेथे जाती ||” महाराजांच्या वचनानुसार संस्थेत याती कुळाचा विचार न करता एवढेच नव्हे तर धर्माचाही विचार न करता सर्वांसाठी मुक्त ज्ञान सत्र अव्याहत चालू ठेवले आहे. त्यामुळे गरीब-श्रीमंत ,ग्रामीन-नागरी सर्व जातीधर्मामध्ये विद्वानकीर्तनकार निर्माण झाले आहेत. संत साहित्याचे विचाराचे अभ्यासक निर्माण झाले आहेत . त्याच बरोबर भक्तीं व ज्ञान या दोन तीरांचे समन्वय साधणारे अभ्यासक निर्माण झाले आहेत. या भौतिकवादि,चंगळवादि, स्पर्धात्मक काळातही धर्ममनिष्ठ, आचारशुद्ध, विचारशुद्ध युवकांची पिढी निर्माण झाली आहे व पुढेही होत राहील.
संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेव महाराजांनी जसे तेराव्या शतकात सर्व जाती धर्मात स्त्री पुरुष साक्षात्कारी धर्माधिकारी, देव तया जवळी वसे | पाप नाशे दारूशने || असे पात्रताप्राप्त संत कवी निर्माण केले. परमार्थ क्षेत्रातील सर्वोच्च वैष्णवी पूज्यता करुण हृदयाने यातिकुळाचा विचार न करता सर्वांसाठी मुक्त केली. वैष्णवांची मांदी (समूह) मेळवून मुक्तीची गवांदीच (अन्नसत्र) घातली. हीच सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत नामदेव महाराज यांनी तेराव्या शतकातच घालून दिलेली वारकरी परंपरा विसाव्या शतकात वारकरी शिक्षण संस्थेने चालविली आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे वर्तमान महाराष्ट्राच्या सर्व थरात, सर्व जाती धर्मात वारकरी सांप्रदायाचा प्रभाव दिसून येत आहे. संस्थेने अनुशासित व प्रगल्भ अशी कीर्तनकार, प्रवचनकार भजन गायक वादकांची परंपरा निर्माण केली व ती उत्तरोत्तर वाढतच चाललेली आहे.

साभार - वारकरी शिक्षण संस्था