Tuesday 28 March 2017

ह.भ.प.वै. विठ्ठल महाराज घुले (सचिव)


ह.भ.प.वै. विठ्ठल आश्रुबा घुले महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्थेत १९४७ ते १९५१ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच संस्थेत आजीवन सेवा करण्याचा निश्चय करून त्यांनी संस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास प्रारंभ केला. ते दि. ४ डिसेंबर १९८० ते २० नोव्हेंबर १९८४ असे ३ वर्ष ११ महिने संस्थेचे सचिव होते. त्यांचे जीवन सुचीर्भूत पवित्र व त्यागी होते. त्यांनी संस्थेलाच आपले सर्वस्व मानून स्वतःसाठी वेगळे असे मठ, धर्मशाळा , आश्रमाच्या रूपाने काहीही निर्माण केले नाही. ते निष्कांचन, अनिकेत आयुष्य जगले. ते ह.भ.प.वै. शांताराम गुरुजींचे पट्टशिष्य होते. ते अत्यंत स्पष्टवक्ते व अन्याय, अनाचार, भ्रष्टाचार या विरुद्ध संघर्ष करत व परिणामाची तमा न बाळगता खंबीरपणे उभे राहत असत. विद्यार्थ्यांना शिस्त लावतानाही सवंग लोकप्रियता ते टाळत. त्यांनी सन १९९३ नंतर संस्थेतील मनमानी कारभाराला आळा घालुन संबंधित व्यक्तींचे राजीनामे घेई पर्यंत त्यांचा पाठ पुरावा केला. त्यांना फडकरी वारकरी व संस्थेतील आजी माजी विद्यार्थ्यामध्ये फार मानाचे स्थान होते.
त्यांनी उठविलेल्या प्रश्नासाठी हजारो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत . ते सतत विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांबाबत व वारकरी शिक्षण संस्थेचे लोकशाही , सार्वजनिक स्वरूप टिकून राहावे म्हणून जागरूक असत. आज संस्थेचे जे सार्वजनिक स्वरूप आहे, कारभारातील पारदर्शकता, स्थावर जंगम मालमत्ता व अन्य गुणवत्ता टिकून आहे हे त्याचे श्रेय वै. विठ्ठल बाबा घुले यांनी उपेक्षा, अपमान सहन करून केलेल्या संघर्षाला आहे. अशा सत्यनिष्ठ महापुरुषाला त्यांचा आजीमाजी विद्यार्थी वर्ग कधीहि विसरू शकणार नाही. त्यांच्या योगदाना बद्दल संस्था त्यांची ऋणी आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था