Tuesday 28 March 2017

ह.भ.प.वै. सीताराम महाराज जगताप (सचिव)


ह.भ.प.वै. सीताराम महाराज जगताप यांनी वारकरी शिक्षण संस्थेत १९६४ ते १९६८ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच संस्थेत आजीवन राहून सेवा करण्याचा निश्चय करून त्यांनी संस्थेला आपले जीवन सर्वस्व अर्पण केले. ते दि. २९ नोव्हेंबर १९८६ ते ३० मार्च १९९५ असे ९ वर्ष ४ महिने संस्थेचे सचिव होते. संस्थेच्या त्यागपरंपरेला अनुसरून निस्पृह असे शुद्ध जीवन जगले. कोणताही स्वतंत्र असा परिग्रह त्यांनी निर्माण केला नाही. त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संप्रदायाची सेवा केली.
प.पू. जगताप महाराज शिस्तप्रिय, करारी स्वभावाचे होते. ते याच परिसरातील असल्यामुळे संस्थेला अडचणीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाने मदत करीत असत.जेव्हा जेव्हा संस्थेला अपप्रवृत्ती अपाय करू पहात तेव्हा ते त्यांच्या विरुद्ध निर्धाराने ठाम उभे रहात असत.त्यांनी दिनांक २५ जून २०११ च्या सर्वसाधारण सभेत भाग घेऊन अनेक विषयांवर चर्चा करून सर्वांना प्रेमाने निरोप दिला व दि.२६ जून २०११ रोजी इहलोकाचा व आपणा सर्वांचा निरोप घेऊन वैकुठवासी झाले.त्यांची स्मृती संस्थेस सदैव प्रेरणा देत राहील. त्यांची चरणी साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था