Tuesday 28 March 2017

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज

वारकरी संप्रदायात आळंदीपंढरीची काया वाचा मने जिव्हे सर्वस्वे उदार होऊन निस्सीम भक्तिने दरमहा पायी वारी खांद्यावर पताका घेऊन करणारे वारकरी हे सर्वश्रेष्ठ परमपूज्य मानले जातात व तो संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबरच दुसरे आदरणीयस्थान फडकऱ्याचे आहे. पिढ्यानपिढ्या दिंडीने पंढरपूर व संतांच्या पवित्र क्षेत्री वारीस जाऊन दशमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येला काला करून परत येणे ही फडकऱ्याची गेली सातशे वर्षांची पवित्र परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माची पताका पिढ्यानपिढ्या वहन करणारे दिंडी व फड चालविणारे वारकरी महाराज मंडळी म्हणजेच वैष्णव वारकरी म्हणून संप्रदायात अतिशय पूज्य आहेत. असे असूनही सर्वसामान्य समाजात संप्रदाय प्रचाराला मर्यादा पडत होत्या. फडकऱ्याचे पद वंश परंपरेने आरक्षित होते.ही मर्यादा मान्य करून ज्या कुटुंबात संप्रदाय परंपरा आहे व ज्या कुटुंबात ती नाही अशाही कुटुंबातील सदाचार, संपन्न, अभ्यासू अन्य लोकांनाही वारकरी होऊन कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, धर्मनिष्ठ, आचारबद्ध होण्याची संधी मिळावी . संप्रदायाचा सर्वत्र समाजात, सर्वस्थरावर विस्तार व्हावा. कीर्तन, प्रवचन, भजन परंपरा वाढावी म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आपली सर्वसंगपरित्यागी वैराग्याऋत्ती बाजूला ठेऊन, सर्वसामान्यांच्या पारमार्थिक हितासाठी वारकरी शिक्षण संस्थेची श्रीक्षेत्रआळंदी येथे स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात परमार्थाची पूर्व परंपरा असलेले व नसलेले अनेक वारकरी संप्रदायात कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, भजनगायक, वादक तयार झालेले आहेत. याचे सर्वश्रेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणप्रसादास आहे. म्हणून अशा पवित्र चरणास साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था