Tuesday 28 March 2017

ह.भ.प.वै.मारोती विठोबा गुरव तथा गुरुवर्य मारोतीबाबा गुरव (सचिव)


प.पू.वै. मारोती बाबा गुरव हे जोग महाराजांच्या चार शिष्यांपैकी एक होते.ते वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य होते. ते २ फेब्रुवारी १९२३ ते ८ जुलै १९४३ असे एकूण २० वर्ष ५ महिने सचिव होते. त्याच बरोबर आजीवन शिक्षकही होते.त्यांनी आपल्या गुरुपदाचा निर्वाह करताना (निभवताना) " शिष्याची जो न घे सेवा | मानी देवा सारिखे || " या संत तुकोबारायांच्या वचनाला अनुसरून शिष्यांकडून सेवा न घेता शिष्य निवासाच्या पायरीची पूजा ते करायचे.
प.पू.वै. मारोती बाबा आपल्या शास्त्र अध्ययन जिज्ञासेपोटी अनेक ठिकाणी गेले असता त्यांना वैदिक, दार्शनिक, पुराणिक व हरिदासांकडून उपेक्षा व वंचना मिळाली .
स्मार्त सनातन धर्ममतानुसार देववाणी संस्कृत भाषा व श्रुती स्मृती पुराणोक्त धर्मग्रंथ अध्यायनाचा व अध्यापनाचा अधिकार सर्वांना नाही हे त्यांना अनुभवावे लागले. त्यानंतर काही वारकरी नसलेले पण वारकरी संत तत्वज्ञानाचे विवेचन, प्रवचन, प्रकाशन करणारे भेटले पण ते आपले स्मार्त दार्शनिक मत वारकरी लोकांच्या गळीं उतरविण्यासाठी संतवचनांना तोडूनमोडून शिकवयाचे हे शुद्ध अंतकरणाच्या निष्ठावान वारकरी परमपूज्य मारुती बाबांच्या लक्षात आले. त्यावेळी संतांच्या ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, संत तुकाराम महाराजांची गाथा, ही वारकरी प्रस्थानत्रयी गौण असून वेदांत दर्शनाचे हिंदी गाईड्स, विचारसागर इत्यादी पुस्तके हे वारकरी प्रस्थानत्रयी पेक्षा कसे अभ्यसनीय आहेत असा चाललेला प्रचार मारुती बाबांना दु:खी करत होता. परमपूज्य मारुती बाबांच्या योग्य गुरूच्या शोधात असताना माउलीच्या कृपेने त्यांना जोग महाराजांच्या रूपाने योग्य सद्गुरूची प्राप्ती झाली. जोग महाराज म्हणजे वारकरी संत संप्रदायाचे शुद्ध मूर्तिमंत स्वरूप होते. त्यांनी पुढेही आपला स्वतंत्र जोग संप्रदाय सुरु न करता ते स्वतःला वारकरी संतांचा अंकित मानत. हीच ज्ञानोबा तुकोबारायांची परंपरा समाजात सर्वत्र प्रचारित व्हावी. सगुण प्रेमभक्ती, भजन,कीर्तन, प्रवचन, संतप्रस्थानत्रयी पारायण, नामसप्ताह, दिंडीने पायी वारी इत्यादि वैष्णव परंपरा सहजपणे लोकांना अंगीकारता याव्यात यासाठी एक संस्था असावी म्हणून परमपूज्य मारुती बाबांनी आपले दैवत ज्ञानेश्वर माउली व सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी हट्ट धारला व तो वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने पूर्णही झाला अशा परमश्रेष्ठ वारकरी वैष्णवाच्या चरणी "ठेविता हा पायी जीवी थोडा " हेच खरे आहे. आज जो महाराष्ट्राच्या सर्व थरांमध्ये भजन कीर्तन, प्रवचनाचा प्रसार दिसून येत आहे त्या पाठीमागे परमपूज्य मारुती बाबासारख्या भगीरथाचे प्रयत्न समाज कधीही विसरणार नाही. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

साभार - वारकरी शिक्षण संस्था