Sunday 15 December 2013

जादू-टोणा विरोधी कायद्याला पाठिंबा देण्यासाठी 
आझाद मैदानावर वारकऱयांची दिंडी
आळंदी येथील बैठकीत वारकरी संघटनांनी घेतला निर्णय

.
मुंबई (प्रतिनिधी) : जादू-टोणा विरोधी कायदा हा वारकरी संतांनी सातशे वर्षे केलेल्या लोकजागृतीचा विजय असून या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या नेतृत्वाखाली राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान दिंडी निघणार असल्याची माहिती वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळय़ाच्यानिमित्ताने लाखो वारकरी आळंदी येथे दाखल झाले आहेत. बुवाबाजी करणाऱया काही लोकांनी वारकऱयांचा या कायद्याला विरोध असल्याचा अभास निर्माण केला आहे. त्यासाठी वारकरी संप्रदायातील काही बोगस धर्माचार्यांना हाताशी धरून कायद्याविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे वारकऱयांच्या मनामध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळय़ानिमित्त आळंदीमध्ये `ज्ञानेश्वर महाराज साधक आश्रम' येथे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध वारकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत तुकाराम महाराज सांगळे यांनी हा कायदा वारकरी किंवा हिंदुपरंपरेच्या कुठेही विरोधात कसा नाही याबाबत कायद्याच्या प्रत्येक कलमाचे विवेचन करून सांगितले. वारकऱयांनी उपस्थितीत केलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये धर्माचार्य अशी कोणतीही पदवी नसताना अशी बोगस पदवी लावून फिरणारे लोक बुवाबाजी करणाऱयांची सुपारी घेऊन या कायद्याला विरोध करीत असल्याचे गोविंद महाराज साळेकर यांनी सांगितले. अशा बोगस धर्मांच्या भुलथापांना बळी न पडता वारकऱयांनी या कायद्याच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन साळेकर यांनी केले.
जादू-टोणा विरोधी वट हुकामाचे कायद्यात रुपयांतर व्हावे या मागणीसाठी विविध संघटनांचा मोर्चा 2 डिसेंबर रोजी भायखळा येथील राणीबाग पासून आझाद मैदानापर्यंत निघणार आहे. या मोर्चामध्ये दिंडीने सहभागी होऊन वारकरी या कायद्याच्या विरोधात नसल्याचा संदेश आम्ही देणार आहोत. वारकरी संतांच्या विचारांना वंदन करणाऱया प्रत्येक वाकऱयांनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले आहे.
.
संपर्क :
शामसुंदर महाराज सोन्नर - 9594999409
तुकाराम महाराज सांगळे - 9892166470
अक्षय महाराज भोसले -Akshay Bhosale
8451822772