Sunday 15 December 2013

दत्तगुरूंचे २४ गुरु

दत्तगुरूंचे २४ गुरु 


:: दत्तरूपी अवधूताचे २४ गुरु :: 

१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता

पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी. पृथ्वी कडून अवधुतांना सहिष्णुता आणि सहनशीलता हे गुण शिकायला मिळाले. पृथ्वीवरील सर्व जीव तिच्यावर ह्या न त्या मार्गाने आघात करीत असतात. कधी तिला नागरून, कधी खणून, कधी पोखरून तर कधी मलविसर्जन करून परंतु पृथ्वी समान भावाने आणि आपल्या सहनशील गुणाने सर्वांना तिच्या काळजातून पिक देते ज्यामुळे सर्व मानवसृष्टी आपले उदरभरण करते. पृथ्वी ठाई सर्वांना जागवण्याची शक्ती आहे. ती सर्वांना नुसते पिकाचं नव्हे परंतु अनेक रत्ने, खनिजे सुद्धा देते आणि ते देखील निरपेक्ष भावनेने.

१.१. वृक्ष ( उपगुरु ) :: परोपकार

वृक्षाचा परोपकार हा गुण अवधूतांनी ग्रहण केला. वृक्ष निरपेक्ष मनाने, सर्व प्राणीमात्रांना छाया देतो, पक्ष्यांना निवासाचे स्थान देतो, सर्वांना गोड फळे देतो. कुठलाही दुजाभाव वृक्षाठाई नाही. आपण त्याला दगड मारला तरी वृक्ष त्याच्या परोपकारी वृत्तीला कधीच सोडत नाही. वृक्षाच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडाचा सर्वतोपरी उपयोगच होतो. अनेक छोटे - मोठे जीव वृक्षावर अवलंबून असतात परंतु त्याने त्याचा सार्थ अभिमान न बाळगता ते आपल्या सेवेस सदैव रुजू असते.

१.२. पर्वत ( उपगुरु ) :: संपादन आणि संचय

पर्वत आपल्या उदरामध्ये अनेक खनिजे, रत्ने ह्याचे संपादन करून संचय करून ठेवते. आणि मानवास त्याचा उपभोग घेता येतो. इतकेच नव्हे तर ते पाण्यासारखा मुलभूत रत्नाचाही, पर्वत स्वतःमध्ये संचय करते. परंतु वेळ आली कि हे सर्व मानवालाच अर्पण असते. तसेच मानवांनी ज्ञान संपादन करून त्याचा संचय करावा आणि इतरांना त्याचा लाभ निरपेक्ष मनाने व बुद्धीने उपभोगू द्यावा.

२. वायु :: विरक्ती

वायु हा मुक्त संचारी आहे. तो सर्वांना स्पर्शून जातो. सुगंध, दुर्गंध ह्यांना देखील स्पर्श करतो परंतु तो ह्यातून मुक्त आहे. तो कुणातही अडकून न राहता त्याचा तो मुक्त संचार करीत राहतो. उष्ण प्रदेश असो अथवा शीतकटिबंध वायु त्याची मार्गक्रमणा पूर्ण करतो. मानवाने वायूचा हा गुण आत्मसाद करावा. कोणत्याही गुण- दोषांत अडकून न राहता श्रुतीप्रतिपादित मार्गक्रमणा करावी. कोणत्याही प्रदेशातून विहार करीत असता तेथेच खिळून राहू नये.

३. आकाश :: अचल, अविनाशी

आकाश स्थिर, अचल आणि अविनाशी गुणांनी युक्त आहे. राजाचा महाल असो अथवा गरीबाची झोपडी आकाश त्याचे पांघरूण सर्वांवर पांघरते. तिथे लहान मोठा हा भेदभाव नाही. आकाश सर्वव्यापी आहे. निश्चल आहे. निर्विकार आहे. त्याच प्रमाणे आत्मा हा सर्वव्यापी आहे. अविनाशी आहे. जसे आकाश ढगांनी व्यापलेले असले तरी आकाशाचे सतंत अस्तित्व टिकून आहे त्याच प्रमाणे शरीर आवरणामध्ये आत्मा झाकलेला जरी असला तरी कोणत्याही स्थितीचा चांगल्या - वाईट परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.

४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता

उदक म्हणजेच पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे निर्मल राहून इतरांच्या मनातले मलीन विचार साफ केले पाहिजे. पाण्याचे अनेक गुणधर्म विषद करता येतात. पाण्याला ज्या आकारामध्ये आपण टाकतो तो त्या आकाराचे रूप स्वतः धारण करतो परंतु स्वतःचे सत्त्व सोडत नाही. त्याचप्रमाणे मानवाने सर्व परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे सत्त्व टिकवले पाहिजे. ज्या प्रमाणे पाण्यात सर्व घटक विरघळवण्याची क्षमता आहे तसेच पाणी त्यात सामावणारे गढूलत्व तळाशी ठेवते आणि स्वछ निर्मल पाणी वरती राहते . ह्या गुणधर्मांचा अवलंब मानवाने करून इतरांच्या मलीन कर्मांना तळाशी स्थान देऊन निर्मल मनाने त्यांच्या पातकाचे क्षालन करावे. उदक हे सर्वांसाठीच ज्या प्रमाणे अमृत बनून वाहत असते. त्याप्रमाणे मानवाचा सहवास अमृतासम भासावा ह्याकरिता पाण्याचे हे गुणधर्म आचरणात आणावेत. पाणी जर एकाठिकाणी साचून राहिले तर त्याचे दबके तयार होते. आणि दबके हे साचून राहिल्यानी कालांतरानी दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे ज्ञानार्जन करताना मानवानी कुठेही थांबून साचलेल्या दुर्गंधीयुक्त दबक्या समान न होता एका निर्मल स्वछ झर्याचे गुणधर्म आचरून सतत विहार करावा. पवित्र राहून आपल्या मधुरतेने दुसर्यांना सतत सुखवीत राहणे हाच खरा पुरुषार्थ.

५. अग्नी :: पवित्रता

अग्नी.. अतिशय पवित्र अशी अग्नी तिच्या मध्ये सर्व चांगले - वाईट सामावून घेते. तिच्या तेजाने सर्व मळभ नाहीसे करते. कोणताही दुजाभाव तिच्यामध्ये नाही. आणि आपल्या तेजाचा तिला गर्व नाही. राखेखाली दुमसत राहून आपल्या तेजाला राखेची किनार ती जोडते. आणि एक महत्वाचा गुण म्हणजे सर्वांना उब प्रदान करते. तेव्हा अवधूत म्हणतात कि त्यांच्या पाचव्या गुरु कडून त्यांनी हि शिकवण घेतली कि मनुष्याने अग्नी प्रमाणे तप करून ज्ञानाने तेजस्वी होणे गरजेचे आहे. अग्नीची पवित्रता बाळगून सर्वांसमवेत समान आचरण ठेवावे. आपल्या कुठल्याही कृत्याला अहंकाराची झाल लागू ना देता आपल्या आत्म्याचे तेज जपावे.

६. चंद्र

चंद्र १६ कलांमधून भ्रमण करतो. अमावस्येची कला तिथपासून पौर्णिमेपर्येंत असे १६ आकार चंद्र घेतो परंतु चंद्राचे असे कमी जास्त होणे चंद्रास बाधक नाही. त्याचप्रमाणे जन्म, वाढ, स्थिती, विकास, क्षय आणि नाश हे सहा विकार देहाला लागू पडतात. आत्मा ह्यातून मुक्त आहे. ह्याचे कारण असे कि चंद्राच्या कला ज्या आपण बघतो त्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या योगाने, परंतु तत्वतः चंद्र तसाच आहे. तसाच आपल्या शरीर ज्या विकारांमधून जाते त्यामुळे आत्म्याचा स्थायी भाव बदलत नाही.

७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार

सूर्य आणि मानवाचा आत्मा हे अवधूतांना एकसमान भासतात, कारण ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता सूर्य पाण्यात बुडून जात नाही किंवा सूर्य गढूळ होत नाही. ते पाणी वाहताना जर पहिले तर सुर्यचे प्रतिबिंब विकृत जरूर होईल परंतु मुलतः सूर्य ह्या सर्व विकारांपासून आलिप्त आहे, तसेच आत्मा हा मानवी शरीरच्या कोणत्याही विकारास बाधक नाही तो सर्वार्थ असून आलिप्त आहे. मानवाचा देह कसाही असो, कोणतेही कर्म सिद्ध करत असो तरीही आत्मा त्याचे अस्तित्व स्वतंत्र राखते. आत्म्याची शरीराबरोबर सोबत हि एखाद्या प्रतिबिंबा इतकीच असते.
सूर्याचा दुसरा गुण म्हणजे सूर्य दररोज सर्वांना त्याच्या सूर्य किरणांनी तेज प्रदान करतो. अंधार नाहीसा करतो. कोणताही मनात भेदभाव न बाळगता सर्वांवर आपल्या तेजाची पाखरण करतो. अन्नधान्य पिकवण्यास सहाय्यक ठरतो. जमिनीवरील पाण्याचा संचय करून आवश्यक त्यावेळी पर्जन्य वृष्टी करून सर्वांची तृष्णा शालन करतो. त्याप्रमाणे मानवाने सूर्यप्रमाणे आपल्या ज्ञानाच्या तेजोकिरणांनी सर्वांच्या हितार्थ अज्ञानाच्या अंधाकाराचे पतन करावे. सर्वांसोबत समान वागणूक ठेवावी.

८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती

एका वनामध्ये अवधूतांनी एक कपोत पक्ष्याच्या जोड्याला बघितले. जे एकमेकांच्या प्रेमात लुब्ध होऊन रानावनात संचार करीत. एकमेकांवर जीवापाड प्रेम करून त्या कपोतानी त्याचा सुंदर असा संसार थाटला होता. काही दिवसांनी कपोती गरोदर राहिली आणि तिनी काही अंडी दिली. कपोत आणि कपोती त्या अंड्यांना प्रेमची उब देत असे आणि त्यांचे दिवस असेच प्रेमात चालले होते. त्या अंड्यातून गोंडस पिल्ले बाहेर आली. आपल्या पिल्लांना उत्तम दर्ज्याचा आणि मुबलक चारा मिळावा ह्यासाठी कपोत आणि कपोती आता जीवापाड मेहनत करू लागेल. आणि एक दिवस आपल्या पिल्लांना चारा आणायला गेलेल्या कपोत आणि कपोतीच्या पिल्लांना फासेपारध्यांनी आपल्या जाळ्यात अडकून टाकले. आपल्या पिल्लांना जाळ्यात तळमळताना पाहून कसलाहि विचार न करता कपोती स्वतः जाळ्यात धावून गेली आणि तिने आपले प्राण गमावले. आपल्या पिल्लांना आणि कपोतीला असे प्राण गमवलेले पाहून कपोताने आपले प्राण आपल्या कुटुंबासाठी दिले आणि तो स्वतः जाळ्यात गेला. कुटुंबाबद्दलची आसक्ती विवेक बाजूला ठेवायला लावते. संसारच्या मोहातून विरक्त होऊन मानवानी सुखार्जन केले पाहिजे नाहीतर तो काळाचा भक्ष होईल.

९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट

अजगराला गुरु करताना त्याची उदासीनता लक्षात आली. देहानी विशाल, शक्तींनी अचाट, सामर्थ्यानि बलवान अश्या अजगराकडे आपण बघतो तेव्हा तो शांत, अविचल, स्थिर भासतो. अजगर त्याला त्याच्या प्रारब्धाने जे काही अन्न भक्षणास मिळेल ते तो गोड समजून भक्षण करून निपचित पडून राहतो. मग ते अन्न थोडे असो कि जास्त, कडू असो कि गोड, अजगरास त्याची भ्रांत सतावित नाही. तो कितीही संकटे आली किंवा त्याला कितीही डिवचले, मारले तरी तो वार करीत नाही. आहे त्यात तो संतुष्ट राहून आपले जीवन व्यतीत करतो. मानवाने देखील अजगराच्या ह्या गुणाप्रमाणे आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे काही मिळेल जसे मिळेल त्याचा स्वीकार करून सुखी राहिले पाहिजे. लोभाला दूर लोटून आत्मसंतुष्टी प्राप्त केली पाहिजे.

१०. समुद्र :: समतोल

समुद्राची समतोल आणि धीरगंभीर वृत्ती अवधूतांच्या नजरेतून सुटत नाही. अतिशय विशाल अश्या समुद्राची खोली आपल्याला निश्चित मोजता येत नाही. सदैव प्रसन्नतेने वाहणाऱ्या समुद्राला प्रवाह नाही. तो निर्मळ आहे. पर्जन्य वृष्टी होऊन नद्यांना पूर येतो आणि अनेक नद्या समुद्रास येऊन मिळतात ह्याच्या व्यर्थ गर्व बाळगून समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. किंवा निसर्गातल्या सुकलेल्या वातावरणाने समुद्र कधी आटत नाही. ह्याचाच अर्थ असा मानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या सुखाने कधीही फुलून जाऊ नये अथवा दुःखाने खचून जाऊ नये. समुद्र त्याच्या खोलीचा थांग लागू देत नाही परंतु अनेक रत्नांची आपल्यावर परमार करतो. अनेक रत्नसाठा हा समुद्राच्या पोटातून मानवाला उपभोगायला मिळतो. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या गुणांचा थांग लागू न देता त्याचा उपयोग दुसर्यांच्यासाठी जरूर करावा.

११.पतंग :: मोहाचा त्याग

पतंग हा असा एक कीटक आहे जो फुलपाखराप्रमाणे असतो परंतु त्याला दिव्याच्या तेजाची अति ओढ असते. दिव्याच्या प्रकाशाला जाऊन तो बिलगतो, परंतु त्या दिव्याला बिलगल्यानी त्या पतंग्याचा जळून मृत्यू होतो. तरीही ते पाहूनही दुसरा पतंग त्याचा मोह आवरू शकत नाही आणि तोही मृत्युच्या पाशात ओढला जातो. पतंग्याच्या ठाई असलेला लोभ त्याच्या विवेकाचा मारक होतो त्यामुळे अति मोहामुळे मानवानी कोणत्याही लोभस बळी पडू नये आणि आपला काळ ओढवून घेण्यासाठी कारणीभूत होऊ नये. माणसाने कोणत्याही परिस्थितीत विवेकशून्य बनू नये. ह्याकरिता पंतगाला गुरु बनवले.

१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त

भ्रमर म्हणजे भुंगा हा प्रत्येक फुलाचा रसिक बनतो आणि प्रत्येक फुलाचा आस्वाद घेण्यासाठी तयार होतो. ज्याप्रमाणे भुंगा फुलांमधील रस ग्रहण करतो त्याप्रमाणे योग्याने ज्ञान ग्रहण करावे सारग्रहण करावे. परंतु भ्रमर ज्याप्रमाणे फुलाच्या प्रेमात पडून त्या फुलाचा आसक्त होतो, फुलाने आपली पानं मिटून घेतली तरी त्या फुलाला दुखापत होऊ नये म्हणून हालचाल न करता स्तब्ध राहतो व आपला काल ओढून घेतो त्याप्रमाणे योगी माणसांनी कसल्याही मोहामागे आसक्ती दर्शवू नये.

१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ

मक्षिका (मधमाशी) :: इथे अवधूतांनी मधुहा आणि ग्राममाशी ह्यांची तुलना केली आहे. मधमाशी, अतिशय कष्ट करून, श्रम करून मधाचा दिवस न रात्र संचय करते. तिचे पोळे अश्या उंच ठिकाणी ती बांधते कि तिथे इतरांना पोहोचणे कठीण असते. मधमाशी साठवलेल्या मधाचा स्वतःही उपभोग घेत नाही आणि इतरांनाही त्या साठवलेल्या मधाचा उपभोग घेऊ देत नाही.परिणामतः मध गोळा करणारे लोक येतात आणि सर्व मध तर नेतातच पण मधमाशीने कष्टाने बांधलेले पोळे तोडून-मोडून जातात.

ग्राममाशी :: ह्याच्याच अगदी विरुद्ध ग्राममाशी ती कधीच कोणत्या गोष्टींचा, अन्नाचा संचय करत नाही. जे मिळेल ते ती खावून मोकळी होते आणि आपली उपजीविका अव्याहत चालू ठेवते. निवाऱ्याची चिंता तिला नसते. ह्याचाच अर्थ असा कि योगी पुरुषाने लोभाची गाठोडी सोबत बाळगून दुखी, कष्टी होऊ नये. उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागून जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे. निवाऱ्याची चिंता योग्याने करू नये आणि ज्ञान सोडून धनाचा, अन्नाचा अथवा कोणत्याही गोष्टीचा संचय योग्याने करू नये.

१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन

शक्तिशाली, बुद्धिवान प्राणी म्हणजे हत्ती. उन्मत्तता आणि प्रचंडशक्ती असून देखील लहान - थोर असा भेदभाव न करता सदैव नम्रतेने खाली बघून चालणारा आणि सर्वांना वंदन करणारा गज जेव्हा कामवासनेला भुलतो तेव्हा स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरतो. हत्तीला पकडण्यासाठी बनवलेल्या खड्डया मध्ये हत्तीणीची लाकडी प्रतिकृती उभारून मानव त्यावर हत्तीणीची कातडी पांघरतात. तिच्या वासाने हत्ती आपली विवेकबुद्धी विसरून कामासुखास बळी पडतो आणि मानवाचा दास होतो. त्याचप्रमाणे योग्याने नम्र जरूर असावे परंतु स्त्रीसुखास भुलून आपला विवेक सोडू नये नाहीतर काळ नक्कीच विनाश बनेल.

१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग

वाऱ्याप्रमाणे अतिशय वेगवान असे मृग नेहमी भीतीनी ग्रस्त असते. आपला जीव मुठीत घेऊन भिरभिरत्या नजरेने बघत असते. चपळता असूनही मृगाची चंचलता त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. कस्तुरी-मृग मधुर गायनाला, वाद्याच्या मधुर ध्वनी लहरींवर लुब्ध होऊन पारध्याच्या जाळ्यात अडकतोच. मृगाची बेसावधवृत्ती, चंचलता, आणि नादाप्रती अति लोभापायी मृगाला पराध्याचे शिकार व्हावे लागते. योगी पुरुषाने ह्याचे जरूर भान ठेवावे. आसक्ती अथवा लोभापायी चंचल बनू नये. बेसावध राहून एकदा का काळ ओढवून घेतला कि दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो हे नीट समजून योग्याने आपले आचरण शुद्ध ठेवावे. नादलुब्धते पासून योग्याने दूर राहावे. भगवंताच्या गुणांचे वर्णन अथवा ॐकार स्वरूप नाद ह्यांशिवाय इतर नाद हे योगी पुरुषाला साजत नाही.

१६. मासा :: ओढ, आसक्ती

मासा पाण्यात राहणारा एक जीव. परंतु त्या माश्याला पाण्याची इतकी ओढ, इतकी आस असते कि तो पाण्यावाचून एक क्षण जिवंत राहू शकत नाही. त्याची पाण्याशी असलेली आसक्ती, ओढ हि परमोच्च असते. माश्याला पाण्याहून विलग करता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताविषयी योगी पुरुषाला तितकीच ओढ असावी. भगवंताच्या नामस्मरणाने योग्याचे प्रत्येक क्षण व्यातीती व्हावेत. भगवंत आणि भक्त एकरूप झाले पाहिजेत कि भगवंतापासून भक्ताला विलग करणे म्हणजे शरीरापासून आत्म्याला विलग करणे.
माश्याचा अजून एक गुणधर्म म्हणजे रसनेची तृप्ती होण्यासाठी गळाला अडकवलेले अन्न मासा ग्रहण करायला जातो आणि आपला मृत्यू ओढवून घेतो त्याप्रमाणे योग्याने त्याच्या जिव्हेच्या स्वादास अति महत्व देणे व्यर्थ आहे.योग्याने परमात्म्यावर विश्वास ठेऊन मिळालेली भिक्षाच संपूर्ण मानवी.

१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन

पिंगला म्हणजेच एक वेश्या, जी आपले शरीर, द्रव्यासाठी विकते आणि कामसुखात लुब्ध राहते. अश्या स्वैराचारीणीला श्री दत्तगुरूंनी कसे काय गुरु बनवले? तर त्याचे कारण,आत्मजागृती आणि परीवर्तन. वेश्या जी धनामागे, वासेनेमागे सर्व श्रुंगार करणारी एक स्त्री, जीची सावली देखील अपवित्र वाटावी. जी पुरुषाला आपल्या शारीरिक सुंदर्यावर नादी लावणारी, हि वारांगना. जि सर्व सुख भोगून देखील ती जणू अतृप्त होती. अनेक दिवस आपल्या मादक सौंदर्याचा व्यर्थ गर्व बाळगून जिने धनाचा मोठा संचय केला. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही तसा तो तिच्या साठी देखील थांबला नाही. जसे दिवस सरले त्या दिवसांसोबत वेश्येच तारुण्य हि सरले आणि कोणीही तिच्याकडे बघेनसा झाले. तिचे सौंदर्य आता काहीच कामाचे नव्हते हे तिला सुधा कळून चुकले परंतु एक वेडी आस लाऊन ती रोज नटून दारात उभी असे, पण तिला बघणार कोण. अश्या परिस्थितीत तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. ज्या गोष्टींना तिने अनन्य महत्व दिले ते फोले होते हे तिला कळून चुकले. आणि ती परमात्म्याला शरण आली. श्रीहरींनी तिचा उद्धार केला. तिला झालेल्या आत्मजागृतीने आणि तिच्या मधील झालेल्या परीवर्तनामुळेच तिला गुरु बनवले. योग्यांनी देखील भौतिक सुखाचा वाली बनू नये. आपल्याकडे असलेले तारुण्य हे चिरकाल नाही हे लक्षात घ्यावे. शरीराचे चोचले पुरवण्यापेक्षा आत्मा आणि विवेक ह्यांना जागृत ठेवावे हीच शिकवण ह्या उदाहरणातून शिकायला मिळते.

१८. टिटवी :: लोभाचा त्याग

टिटवी म्हणजे शिकारी पक्षी. एकदा एका जंगलात अनेक टिटवे पक्षी होते. त्यांच्यातल्याच एका टिटव्यानी एक मोठा मांसाचा गोळा शोधून आणला परंतु जसा त्या सर्व टिटव्यांना त्या मांसाचा वास लागला तसे ते सगळे तिथे गोळा झाले. आणि त्यांनी त्या टिटव्याला चोची मारायला सुरवात केली. असंख्य वेदना होत असूनही तो टिटवा ओरडू शकत नव्हता, कारण तो ओरडला तर मांसाचा गोळा चोचीतून खाली पडेल. पण तो मांसाचा गोळा मिळत नाहीये हे पाहून त्या इतर टिटव्यांनी त्याला पंखांनी फडाफड मारायला सुरुवात केली. आता मात्र वेदना असह्य होऊन त्याने चोच उघडली आणि तो मांसाचा गोळा खाली पडला. तसे ते सगळे टिटवे तिथे जमा झाले आणि त्या एका गोळ्यासाठी भांडू लागले. ह्यावरून योग्यांनी हे लक्षात घ्यावे त्या टिटव्याने त्याला होणारी वेदना दूर करायला त्याला झालेला त्या मांसाच्या गोळ्याचा त्याग केला म्हणजेच लोभाचा त्याग करणे म्हणजेच वेदनेपासून मुक्तता.


१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता

लहान मुलांना देवाचे दूत म्हणतात ते काही खोटं नाही. लहान मुल कोणताही भेदभाव न बाळगता सगळ्यांचा त्वरित स्वीकार करतात. त्याला आपले विश्वच इतके प्रिय असते कि त्याला राग, लोभ, मद, मत्सर, चिंता, त्रागा ह्या गोष्टींची भ्रांतच नसते. मान-अपमान ह्या गोष्टी लहान बालकास शिवत नाहीत. कुतुहूल आणि निरागसता हे गुण बालकाला निसर्गातच देणगी म्हणून मिळतात. कोणी लाडाने खेळवले अथवा कोणी रागाने झिडकारले तरी त्याला त्याचे दुखः होत नाही कि अति आनंदात ते मुल रममाण होत नाही. योग्यांनी हा बालकाचा गुण अंगी बाळगावा. निरागस आणि सरळ वृत्ती ठेवावी. कोणत्याही गोष्टीसाठी राग मानू नये किंवा आनंदात बुडून जाऊन परमात्म्याला विसरू नये.

२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य

कोण्या एका कुमारिकेला घरात राखण करायला ठेऊन तिचे आई-वडील कुलस्वामिनीच्या यात्रेला जातात. त्यावेळी अचानक त्या कुमारिकेचा विवाह ज्या घरात ठरला आहे त्या घरातली मंडळी घरी येतात. घरात कोणी नाही परंतु त्यांचा आदरसत्कार करायला हवा ह्या विचारात ती कुमारिका काहीही न बोलता त्यांच्या आदर सत्काराच्या तयारीला लागते. घरामध्ये तांदूळ सडलेले नाहीत हे पाहून कुमारिका लगेच तांदूळ सडू लागते परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागते. पूर्वीच्या काळी रिवाज असे कि स्त्रियांच्या ककणांचा आवाज होणे बरे नाही, त्यावरून त्या मुलीची अथवा स्त्रीची स्वभाव परीक्षा होत असेल. तेव्हा आपल्या ककणांचा आवाज झाला तर वर पक्षाला वाटेल कि मुलगी दांगट आहे म्हणून त्या कुमारीकेनी आपल्या हातामाध्ले दोन कंकण काढून ठेवले आणि पुन्हा तांदूळ सडू लागली पण तरीहि आवाज होताच होता. त्या कुमारिकेने हातामध्ये एक-एक कंकण ठेऊन आपले काम सुरु केले. ह्यावरून योगी पुरुषाने असे लक्षात घ्यावे कि अनेकजण जिथे एकत्र होतात तिथे कोलाहल होतो आणि दोन जणांमध्ये संवाद. कोणताही गट बनवून राहण्यापेक्षा योगी पुरुषाने साधनेसाठी एकाकीपणा आचरावा.

२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी

सर्प ह्या एकविसाव्या गुरुकडून एकांतवासाचा बोध होतो. सर्प हा एकाकी जगणारा जीव आहे. तो स्वतःचं घरसुद्धा बांधत नाही. मुंग्यांनी कष्टाने बनवलेल्या आयत्या वारुळात तो निवांत जाऊन वास्तव्य करतो. आणि पुन्हा मनात येईल तेव्हा मुक्तपणे संचार करीत राहतो. सर्प सहसा कोणाच्याही दृष्टीक्षेपात न पडता त्याचा तो एकटा विहार करतो. ह्यावरून योगी माणसाने मुक्तासंचारी असावे. निवाऱ्याची विवंचना न करता मुक्तसंचार करावा जिथे विसाव्यास जागा मिळेल तिथे काही क्षण विसावा घेऊन पुन्हा आपली मार्गक्रमणा चालू ठेवावी. त्याचप्रमाणे एकांतवास पत्करावा. योग्यांनी वाईट अथवा चांगल्यांची संगत न करता आपल्या जीवनाची एकाकी वाटचाल करावी जी त्याला परमेश्वरा नजीक पोहोचवेल.

२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त

शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा कारागीर. एक दिवस अवधूतांना एक अपूर्व अनुभव आला, एक साधा बाण तयार करणारा कारागीर आपल्या कामामध्ये इतका गर्क होता कि त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडला. तो आपले काम पूर्ण एकाग्र चित्ताने करत बसला होता. त्या शरकर्त्याच्या झोपडी शेजारून त्या नगरीच्या राजाची राजस्वारी पूर्ण जल्लोषात, वाजत-गाजत, सरंजामासहित गेली. परंतु त्या कोणत्याच गोष्टीचा त्या कारागीरावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा त्या राजाचा सेवक खास त्या शरकर्त्या जवळ आला आणि त्याला विचारले कि, "ह्या वाटेने राजेसाहेबांची स्वारी जाऊन आपण आपले कार्य करीत बसलात, का आपल्याला ह्याची जाणीव झाली नाही?" तेव्हा तेवढ्याच नम्रपणे त्या कारागिराने उत्तर दिले, "महाशय मी माझ्या कर्मामध्ये गर्क असल्या कारणाने मला कसलेच अवलोकन झाले नाही, त्याबद्दल क्षमा असावी." ह्यावरून योगी पुरुषाने एकाग्रता आणि बाळगून ईश्वर चिंतन करावे. परमेश्वर स्वरूपात विलीन होऊन जावे. हाच मार्ग योग्याला मुक्ती प्राप्त करवून देऊ शकतो आणि सर्व

२३. कातणी (कोळी) :: निर्विकार

ऊर्णनाभी म्हणजे कोळी किंवा कातणी. हा कोळी अतिशय निर्विकारपणे जगतो. शाश्वततेचा लोभ करीत बसत नाही. कोळी त्याच्या पोटातून निघणाऱ्या द्रव्यापासून तंतू तयार करून त्याला हवे तसे जाळे विणतो. त्या जाळ्यावर अनेक क्रीडा करतो, लटकतो पुन्हा ते बनवलेले जाळे स्वतःच खाऊन टाकतो आणि पुन्हा नवीन जाळे तयार करतो. कातणी कोणाचाही बांधक नाही मुक्तपणे हव्या त्या जागी हवे तसे जाळे पुन्हा पुन्हा निर्माण करतो. ह्यावरून योग्याने हे लक्षात घ्यायला हवे कि परमेश्वर निराकार, निर्विकार आहे. तो कोणाचा बाधक नाहीये. त्यामुळे परमेश्वराला वाटले तर तो संपूर्ण विश्वाची पुनर्रचना करतो. म्हणूनच ह्या जगात घडणाऱ्या घटनांना योग्यांनी अधिक महत्व देणे व्यर्थ आहे. परमेश्वरा व्यतिरिक्त काहीच शाश्वत नाही हे सत्य मानावे, आणि परमेश्वर आज्ञेप्रमाणे चालावे.

२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास

कुंभारीण माशी म्हणजे भिंगुरटी, एक अळी पकडून आणते आणि तिला भिंतीशी बांधलेल्या घरट्याला बांधून ठेवते. ती अळी मरणाच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या कुंभारीण माशीचा तीव्र ध्यास घेते. इतका कि त्या ध्यासापायी अळीचे कुंभारीण माशीत रुपांतर होते, आणि ती अळी उडून जाते. त्याप्रमाणे योगी पुरुषाने परमेश्वर प्राप्तीचा तीव्र ध्यास धरला पाहिजे. ईश्वराशी पूर्ण एकरूप होऊन जावे. इतके कि भक्त आणि देव ह्यांना ह्याचात फरक जाणवू नये. ईश्वराचा अंश बनून त्या सर्वात्मका भगवंतात भक्ताने पूर्णपणे विरघळून जावे. त्या परमात्म्यालाच आपले अस्तित्व बनवावे. परमेश्वर प्राप्तीतच योगी पुरुषाचा पुरुषार्थ साध्य होतो. ह्या करिता अवधूतांनी कुंभारीण माशीला आपला २४ वा गुरु बनवले.
असे एकून अवधूत चिंतन दत्त गुरु यांचे २४ गुरु ....आज दत्त जयंती..यामुळेच आपण त्यांच्या कडून नक्कीच काही न काही आत्मसात करू हि प्रार्थना ...