Friday 28 August 2015

सूर्यवंश हा गोमातेचा सेवा करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
          पृथ्वीतलावर रावणाचे साम्राज्य असताना अत्याचार वाढला होता. ज्यावेळी पापी माणसांतील हे षडविकारांचे ओझे म्हणजेच काम, क्रोध, लोभ वाढल्याने गायीच्या रुपात पृथ्वीमातेने ब्रह्मदेवाकडे विनंती केली तेव्हा भगवंताने भूतलावर अवतार घेतला, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, माणसांतील कामविकाराने व्याभिचार वाढतो, क्रोधाने हिंसाचार वाढतो तर लोभाने भ्रष्टाचार वाढतो. त्याकाळात हे तिन्ही कामविकार वाढल्याने पृथ्वी गायीच्या रुपात ब्रह्मदेवाकडे गेली. पृथ्वीने गायीचेच रुप का घेतले हे सांगताना महाराज म्हणाले की, गाय ही सहनशीलता, सहनशक्ती, पुण्याचे प्रतीक आहे. कारण गायीच्या पोटात ३३ कोटी देवांचे वास्तव्य आहे असे मानले जाते. संत तुकारामांनीदेखील संतांना गायीची उपमा दिली आहे. गाय ही वासरावर तर संत हे समाजावर प्रेम करीत असतात. सूर्यवंशातील राजा दिलीप याने गोमातेच्या सेवेकरिता प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शविली होती. या गोमातेचे पूजन करणारा सूर्यवंश असल्यामुळेच पृथ्वी गायीचे रुप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. तिने भगवंताकडे प्रार्थना केली. या प्रार्थनेचे चार प्रकार सांगताना महाराज म्हणाले की, दिनता विज्ञापना म्हणजे प्रार्थना करताना स्वत:ची दिनता प्रकट करावी, नंतर भगवंताची स्तुती करावी, त्यानंतर भगवंताकडे आपली अभिलाषा प्रकट करावी, नंतर शांत बसावे हे प्रार्थनेचे प्रकार आहेत. भगवंत अवताराची मिमांसा करताना ते म्हणाले की, निगरुणातून सगुणात येणे म्हणजेच देवाने भक्ताकरिता सोपे होणे होय. या अवतारावर तीन प्रश्न उपस्थित झाले ते म्हणजे देवाला निगरुणात राहून पृथ्वीतलावर कार्य करता येत नव्हते काय? परमात्मा अवताराला आला तर तो संकुचित होता का? आणि भगवंताचा अवतार हा सामान्यांच्या जन्मासारखाच आहे का? हे तीन प्रश्न उपस्थित केले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२