Friday 28 August 2015

पतिव्रताधर्म हेच स्त्रियांचे सौंदर्य - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू || 

   दशरथ राजाला असलेल्या तिन्ही पत्नींमध्ये कैकयी ही सुंदर आहे तर कौशल्या ही पतिव्रता आहे, जो कुरुप मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी विद्वता असणे हे त्याचे सौंदर्य असते, कुरुप पण विद्वान असलेल्या माणसाची क्षमा हे सौंदर्य आहे तर कोकिळा ही दिसायला काळी असली तरी तिचा स्वर तिचे सौंदर्य आहे, त्याप्रमाणे कोणत्याही स्त्रीच्या अंगी पतिव्रताधर्म असणे हेच खरे तिचे सौंदर्य असते, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, अशी ही पतिव्रता असलेल्या कौशल्येला गरोदरपणात एकांतात राहावे वाटायचे. ही तिची निरपेक्ष भावना होती. म्हणजेच विध्येय स्थिती होती. ती स्वत:च्या आनंदात मग्न होती. कौशल्या ही नवृत्ती धर्मात मग्न होती तर दशरथ हा प्रवृत्ती धर्मात होता असे सांगताना महाराज म्हणाले की, कौशल्येला पुत्रप्राप्तीची इच्छा होती. तिला परमात्मा आपल्या पोटात असल्याने कशाचीच इच्छा नव्हती. ज्यावेळेस दशरथ राजा डोहाळे विचारण्यास गेला तेव्हा ती काहीच बोलत नव्हती, मात्र दशरथने आपल्या दोघांच्या लग्नात रावणाने आणलेल्या विघ्नाची आठवण काढली तेव्हा तिला संपूर्ण रामायण आठवले व रामाची काय इच्छा आहे ती तिने बोलून दाखवली. हे सर्व ऐकून जेव्हा राजा दशरथने वसिष्ट ऋषींना बोलावले तेव्हा कौशल्येची ही अवस्था पाहून ते देखील बेशुध्द पडले. तेव्हाच अवतार संकल्पना सुरु होते. अवतार म्हणजे वरुन खाली येणे याचा अर्थ सांगताना महाराज म्हणाले की, वरुन खाली येणे म्हणजे निगरुणातून सगुणात येणे होय. कोणताही अवतार हा साधूंचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे, धर्माची संस्थापना करणे यासाठी होत असतो. मात्र सध्या पृथ्वीतलावर साधूच राहिलेला नसल्यामुळे देवाने अवतार कशाला घ्यायचा असे चित्र निर्माण झाले आहे. आता साधू नव्हे तर संधिसाधू तयार झाले आहेत, असे महाराजांनी स्पष्ट केले. या प्रवचनासाठी गुरुवर्य ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले महाराज, भागवत महाराज कबीर, भास्कर महाराज बोधले, यशवंत महाराज बोधले उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२