Friday 28 August 2015

रामनामासाठी काळ-वेळेचे बंधन नाही- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


|| श्रीगुरू ||
निगरुण रूपात असलेला परमात्मा हा इंद्रियांना गोचर होत नाही म्हणजे कळत नाही, आणि तो परमात्मा इंद्रियांना कळणे म्हणजेच अवतार होय. असा आह परमात्मा सर्वव्यापक आहे, मात्र तो अवताराला आल्यानंतरच प्रगट होतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, परमात्मा हा आकाराला आल्यामुळे र्मयादित झाला आहे म्हणजे तो व्यापक आहे हे कसे सिद्ध होणार याविषयी बोलताना महाराज म्हणाले की, अग्नी ही सर्वव्यापक आहे मात्र तिला आगकाडीचा संबंध आल्यावरच तो प्रगट होतो त्याप्रमाणे परमात्मा हा देखील सर्वव्यापक आहे, परंतु अवताराला आल्यावरच तो प्रगट होतो. ज्यावेळी सीतामाता अशोक वनात होती तेव्हा मंदोदरीने सीतेला प्रश्न विचारला होता की तुझा राम सर्वव्यापक आहे की संकुचित आहे. तेव्हा सीतेने तो सर्वव्यापक असल्याचे सांगितले, त्यावर मंदोदरीने तो सर्वव्यापक असेल तर रावणात देखील आहे मग तू रावणातील रामाला का वश होत नाही. तेव्हा सीतामाता म्हणाली की, राम व्यापक आहे मात्र रावणात काम आहे त्यामुळे तिथे राम नाही. हे सांगताना महाराज म्हणाले की, जिथे काम आहे तिथे राम नाही. तसेच अशोक वनात जेव्हा मंदोदरीला सीतेचे दर्शन झाले तेव्हा तिच्या सर्वांगात राम संचारलेला होता. म्हणून सीतेचे हे उत्तर ऐकून मंदोदरीला देखील विदेह अवस्था प्राप्त झाली होती व तीही राम भजनात तल्लीन झाली होती. म्हणून जो आवडीने रामनाम घेतो त्याला पाहणाराही रामनामात मग्न होतो. रामनाम हे अत्यंत सोपे असून ते घेण्यासाठी काळ-वेळेचे देखील बंधन नाही. जीवाच्या ठिकाणचे संसारबंधन घालविण्यासाठी रामनाम गरजेचे आहे. 
या प्रवचनासाठी बावी येथील ह. भ. प. अंबऋषी महाराज वारकरी शिक्षण संस्था व बाश्रीतील भास्कर मांजरे महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 


८४५१८२२७७२