Friday 28 August 2015

भक्तांना जो रमवितो तो राम - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
वसिष्ठ मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे अयोध्येचा राजा दशरथांच्या घरी चैत्र शु. नवमीला विष्णू रुपात साक्षात प्रभूरामचंद्रांनी, चैत्र शु. दशमीला शेष रुपात लक्ष्मण, चैत्र शु. एकादशीला शंख रुपात भरत तर चक्र रुपात शत्रुघ्न या तीन अलौकिक भावंडांसह अवतार घेताच अवघी अयोध्या नगरी प्रकाशमय झाली. वसिष्ठांनी नवमी, दशमी व एकादशीला तिघांचे नामकरण केले, पण राम असं नाव का ठेवलं, यावर स्पष्टीकरण देताना ह. भ. प. बोधले महाराज म्हणाले, भक्तांना जो रमवितो तो राम, मुनीजन जेथे रमतात तो राम म्हणून राम हे नाव ठेवले. 

भगवंत देवस्थान ट्रस्ट व बोधराज भक्त मंडळातर्फे आयोजित श्रावणमास प्रवचनमालेत ते बोलत होते. राजा दशरथाला या चारही पुत्रांच्या माध्यमातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्त झाले आहेत. पार्वती मातेनं भगवान शंकराकडे रामायणातील रामकथेचा नायक प्रभू रामचंद्र स्वरुप आणि चरित्र जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शंकरांनी सूर्य, वंशावळ त्यातील ६0 वे वंशज राजा दशरथ, त्यांच्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या. त्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म, रामायणातील रामभक्त हनुमान, रावण, बिभीषण, कुंभकर्ण, मंडोदरी, शूर्पणखा आदी इतर पात्रांचा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह परस्पर पण आध्यात्मिक संबंध, परमात्मा अवतार घेतो म्हणजे नेमके काय ? परमात्मा इतका व्यापक असताना संकुचित असा अवतार घेऊन स्वत: येण्याची गरज काय? तो मानवीय देहात अवतारीत झाला तर त्याला कर्मबंधनं आहेत काय आदी प्रश्न उपस्थित करून दृष्टांत दाखल्यासह विविध प्रसंगावर विस्तारानं भाष्य केल्याचे महाराजांनी सांगितले. 
भगवंतांच्या दशावताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे सहा प्रकार आहेत. सामन्यांचा जन्म वैषयिक तर परमात्म्यांचा अवतारिक असतो, असे महाराजांनी सांगितले. याप्रसंगी बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२