Friday 28 August 2015

अयोध्या ही धर्मशील भूमी - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू || 





     जिथे कोणत्याही पद्धतीचे युद्ध नाही अशी अयोध्या नगरी होती. एवढेच नव्हे तर ही धर्मशील भूमी होती. सूर्यवंशातील रघुराजाने आपली सर्व संपत्ती विश्‍वजित यज्ञामध्ये दान केली होती असे सांगून अयोध्येचा राजा दशरथाचे रथ दाहीदिशांना जात होते म्हणूनच त्याचे नाव दशरथ असे ठेवले होते, असे विवेचन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्रावणमासानिमित्त भगवंत मंदिरात सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, राजा दशरथाला कौशल्या, सुमित्रा व कैकयी या तीन राण्या होत्या. यातील कौशल्या ही कोमल मनाची होती,सुमित्रा ही सुविचारी होती तर सातत्याने कर्कश बोलणारी राणी ही कैकयी होती. दशरथ राजा हा सर्वसंपन्न असूनही त्याला पुत्रप्राप्ती नव्हती व त्याला आपल्या कुळासाठी कुलदीपक हवा होता.
या कुलदीपकाविषयी बोलताना महाराज म्हणाले की, ज्यावेळेस रात्र असते तेव्हा चंद्र हा प्रकाश देत असतो तर सकाळ झाल्यानंतर सूर्य हा प्रकाश देणारा कुलदीपक असतो. तर तिन्ही लोकामध्ये धर्माने वागणे हा दीपक असतो हा सुपुत्र जन्माला येणे हे भाग्य असते. समाजामध्ये सुपुत्र, कुपुत्र असे दोन पुत्र असतात याचा मातृवंशाबरोबरच पितृवंश व सध्याच्या समाजाचा संस्कार हे आपला मुलगा सुपुत्र की कुपुत्र हे ठरते. रावण हा कुपुत्र होता तर रावणाचा भाऊ बिभिषण हा सुपुत्र होता. याचे कारण त्याच्या जन्मामध्ये होते. रावणाची वृत्ती ही त्याची आई कैकसीची होती तर बिभिषणाची वृत्ती ही त्याचे वडील विश्रवताची होती. याउलट त्यांचा भाऊ कुंभकर्णामध्ये कोणाचेच गुण नव्हते. कुंभकर्ण हा दुर्जन होता व तो कायमस्वरुपी झोपलेला होता. असे सांगत महाराज म्हणाले की, दुर्जन माणसे ही कायम झोपलेली बरी असतात तर सज्जनाने कायम जागे रहावे लागते. अयोध्या नगरीचे धर्मकृत्यावर कायम लक्ष होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२