Friday 28 August 2015

स्त्रियांचा आदर्श म्हणजे माता कौशल्या - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरु || 

 रामायणातील मुख्य भूमिकेत असणारा रावण हा रजगुणी म्हणजे लोकांना रडविणारा होता, तर कुंभकर्ण हा तमगुणी तर बिभीषण हा सत्वगुणी होता. सत्वगुण हा शांतताप्रधान असतो, रजगुण हा क्रियाप्रधान असतो तर तमगुण हा आळसप्रधान असतो. यातील रजगुण हा सत्वगुणाबरोबर राहिल्यास धर्मकार्य घडते तर रजगुण हा तमगुणाबरोबर राहिल्यास अधर्म घडतो, रामायणामध्ये रजगुणी रावण हा तमगुणी कुंभकर्ण व शुर्पणखेबरोबर राहिल्यामुळेच अधर्म घडला असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
भगवंत मंदिरात श्रावण मासानिमीत्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण यावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. बोधले महाराज म्हणाले की, हाच रजगुणी रावण जर सत्वगुणी बिभीषणाबरोबर राहिला असता तर निश्‍चितच धर्मकार्य घडले असते. रावण हा रजगुणाचे प्रतीक असला तरी त्याची पत्नी मंदोदरी ही पतिव्रता होती.
संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात की, संकल्प विकल्प नाही उदरी, यामाजी म्हणजी मंदोदरी, मंद+उदर म्हणजे जिच्या पोटात संकल्प विकल्प नाही अशी. अशी ही पतिव्रता मंदोदरी दुर्दैवाने रावणाची पत्नी होती. अशा या रजगुणी रावणाला मारण्यासाठी प्रभुरामाचा अवतार झाला.
अयोध्येमध्ये दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी कामिष्ठी नावाचा यज्ञ केला. या यज्ञामध्ये मिळालेला प्रसाद त्याने आपल्या तिन्ही राण्या कौशल्या, सुमित्रा व कैकयी यांना खाण्यासाठी दिला, मात्र कैकयीने तो प्रसाद खाण्यासाठी वेळ लावल्यामुळे तिच्या हातातील प्रसाद घारीने उचलून नेला. त्यामुळे कैकयीचा प्रसादच राहिला नाही. त्यामुळे कौशल्या व सुमित्रेने आपल्यातील निम्मा प्रसाद हा कैकयीला दिला.
कौशल्या व सुमित्रा या दोघींनी दुसर्‍या स्त्रीला मदत करण्याची भूमिका त्यावेळी देखील घेत स्त्रीने दुसर्‍या स्त्रीशी कसे वागावे याचा आदर्श घालून दिला.
आज समाजामध्ये प्रभुराम हा अवतार घेण्यास तयार आहे. मात्र त्याला कौशल्यासारखी माता भेटण्यास तयार नाही, असे सांगताना आजही समाजामध्ये प्रत्येक स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला त्रास न देता मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे महाराजांनी स्पष्ट केले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२